ज्येष्ठ संपादक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:10 PM2020-09-12T13:10:21+5:302020-09-12T13:10:50+5:30
नागपूर तरुणभारतचे माजी संपादक, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर भालचंद्र उपाख्य मामा घुमरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केवळ विदर्भ वा नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविलेले ज्येष्ठ संपादक, तरुणभारतचे माजी संपादक, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर भालचंद्र उपाख्य मामा घुमरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
लॉकडाऊनच्या काळात ते नैरोबीत मुलाकडे होते. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील मुलाकडे आले आणि गेल्या आठवड्यातच नागपूरला परत आले होते. आज सकाळी निद्रावस्थेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. माजी जिल्हा माहिती अधिकारी चंद्रकांत क्षीरसागर हे त्यांचे जावई होत.
त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण ऋजुता होती. संघ आणि विनोबा हे दुर्मिळ आराध्य त्यांनी कसोशीने जपले. ते नवविचारांचे पुरस्कर्ते होते.
मामासाहेब वैयक्तिक, कार्यालयीन आणि सार्वजनिक जीवनात एकच भूमिका घेत. ना. बा. ठेंगडी, माडखोलकरांचे जावई आणि पुभाभावेभक्त , कट्टर हिंदुत्ववादी चंद्रशेखर फडणीस, मुलांचे मासिकचे मा. बा. (शरद) मोडक हे दिग्गज तेव्हा तरुण भारतमध्ये संपादक होते.