आधार ‘अपडेट’साठी ज्येष्ठांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:45+5:302021-03-05T04:09:45+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीकरणासाठी सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. मात्र अनेकांना विविध तांत्रिक ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीकरणासाठी सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. मात्र अनेकांना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या ‘आधार कार्ड’वर कुठल्याही ‘मोबाईल’ क्रमांकाची नोंद नाही. त्यामुळे आता क्रमांक ‘अपडेट’ करण्यासाठी त्यांची पायपीट सुरू आहे; मात्र काही नोंदणी केंद्रांवर तांत्रिक अडथळे येत असल्याने ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
‘आधार’ नोंदणीची सुरुवात झाली असताना सुरुवातीच्या काळात अनेकांच्या क्रमांकाशी ‘मोबाल’ क्रमांक जोडले गेले नव्हते.
; परंतु आता विविध योजना, पत्त्यातील बदल इत्यादींसाठी आधारशी जोडलेल्या ‘मोबाईल’ क्रमांकावर ‘ओटीपी’ जातो. परंतु ज्यांचे ‘मोबाइल’ क्रमांकांची नोंदच नाही, त्यांची अडचण होत आहे.
लसीकरणासाठी अनेक जण गेले असता ‘आधार’ असूनदेखील त्यांच्या क्रमांकावर ‘ओटीपी’ आला नाही. त्यामुळे ‘अपडेट’साठी त्यांनी धाव घेतली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बऱ्याच केंद्रांवर सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे; मात्र काही केंद्रांवर तांत्रिक अडचणी येत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाहणी केली असता, ही बाब समोर आली.
कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’, ‘अपडेट’ बंद
प्रतापनगर पोस्ट कार्यालयात ‘लोकमत’ प्रतिनिधीने ‘अपडेट’संदर्भात विचारणा केली असता, तेथे कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने दोन दिवसांनी या, असे उत्तर देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे कार्यालयातील इतर काम सुरळीत सुरू होते. मग ‘अपडेट’ का बंद ठेवण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. प्रतापनगर रिंग रोडवरील एका खासगी बँकेत आधार ‘अपडेट’चे केंद्र आहे; मात्र मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडथळे असल्याने केंद्रावर कुठलेच ‘अपडेट’ किंवा नोंदणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. लक्ष्मी नगरातील एका केंद्रावर गर्दी कमी होती, मात्र; कर्मचाऱ्यांच्या संथ कामाचा फटका नागरिकांना बसला. ज्या मोबाईलवर ओटीपी येणार होता तो स्वीच ऑफ होता. एका नागरिकाचे कार्ड अपडेट करण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. त्यामुळे इतरांना ताटकळावे लागले.
‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा
अयोध्यानगर पोस्ट कार्यालयात सकाळच्या सुमारास अर्जांचे वाटप केले जाते; मात्र यावेळी रांग लावली जात असताना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र होते. अनेक केंद्रांवर सकाळच्या सुमारास अशीच गर्दी होते व प्रत्यक्ष दुपारी ‘अपडेट’ केले जाते. त्यामुळे नागरिकांना दोनदा पायपीट करावी लागत आहे.
चार केंद्रांवर ‘अपडेट’च नाही
बहुतांश लोक ‘आधार’च्या संकेतस्थळावरील कायमस्वरूपी केंद्र पाहून तेथे ‘अपडेट’साठी जात आहेत; मात्र २५ पैकी चार केंद्रांवर फेब्रुवारी महिन्यानंतर एकाही नागरिकाची माहिती ‘अपडेट’ झालेली नाही. त्यामुळे तेथे जाऊन नागरिकांना वापस परतावे लागत आहे. जर केंद्रांमध्ये सध्या ‘अपडेट’ होत नाही तर संकेतस्थळावर त्यांची माहिती का आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.