ज्येष्ठांना लसीकरण न करता परत पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:12+5:302021-03-13T04:11:12+5:30
नंदनवन लसीकरण केंद्रावरील प्रकार : प्रशासनात नियोजनाचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी ...
नंदनवन लसीकरण केंद्रावरील प्रकार : प्रशासनात नियोजनाचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी विचारात घेता, झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लसीकरण सकाळी ८ ते ३ व दुपारी ३ ते १० यादरम्यान सुरू ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. परंतु लसीकरण केंद्रावरील गोंधळ अजूनही संपला नाही. नंदनवन येथील लसीकरण केंद्रावर चार-पाच तास प्रतीक्षा केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस न देताच परत पाठविण्याचा प्रकार बुधवारी घडला. अन्य केंद्रावरही असेच प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना कोरोना लस दिली जात आहे. कोविड लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी धोकादायक आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्यांना स्वत: घरून लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांकरिता मनपाच्या झोन कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे.
लसीकरणासाठी ऑनलाईन वा ऑफलाईन नोंदणीनंतरही नागरिक केंद्रावर जात आहेत. नंदनवन केंद्रावर बुधवारी ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पोहचले असता सुरक्षा गार्डने काही जणांना प्रवेश नाकारला. दुपारी २ पासून सायंकाळी ५ पर्यंत काही जण लसीकरणाच्या प्रतीक्षेत थांबून होते. मात्र त्यांना परत पाठविण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना गोपाळ इटनकर म्हणाले, मी ४ च्या सुमारास या केंद्रावर पोहचलो. मला गेटवर अडविण्यात आले. बाजूला एक वृद्ध दाम्पत्य दुपारी २ पासून आले होते. पण त्यांना परत जावे लागले. ५.३० च्या सुमारास पुन्हा काही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी आले होते. परंतु परिचारिका ५ च्या सुमारास केंद्रातून निघून गेल्या.
ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यामुळे लसीकरण केंद्रात वाढ केली असून, खासगी रुग्णालयातील केंद्रही वाढविण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. संख्या वाढविली पण नियोजन नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे.