नागपुरात रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला आग लागल्यामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 08:37 PM2018-09-24T20:37:37+5:302018-09-24T20:40:26+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला रविवारी रात्री ९ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु आगीचा धूर रुग्णालयात पोहोचल्यामुळे अतिदक्षता कक्षातील रुग्णांना तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयाच्या स्वीच रूमला रविवारी रात्री ९ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु आगीचा धूर रुग्णालयात पोहोचल्यामुळे अतिदक्षता कक्षातील रुग्णांना तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारी रेल्वे रुग्णालय आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी रविवारी रात्री ९ वाजता या रुग्णालयाच्या लिफ्टमागील स्वीच रूममधून धूर बाहेर येताना दिसला. ड्युटीवरील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वीच रूमची तपासणी केली असता त्यांना स्वीच रूममध्ये आग लागल्याचे समजले. समयसूचकता दाखवून कर्मचाऱ्यांनी अग्निशमन विभागाला आगीची सूचना दिली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत आगीचा धूर अतिदक्षता कक्ष आणि रुग्णालयात पसरला. यात अतिदक्षता कक्षातील रुग्णांची प्रकृती बिघडू नये यासाठी तातडीने या कक्षातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. लागलीच त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. तर काही रुग्णांना याच रुग्णालयाच्या इतर वॉर्डात हलविण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रात्री १ वाजताच्या दरम्यान रुग्णालयातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. स्वीच रूमला आग कशामुळे लागली याचा तपास करण्याची सूचना देण्यात आली आहे.