रेल्वेस्थानकावर पिस्तूल आढळल्यामुळे खळबळ
By admin | Published: April 8, 2015 02:41 AM2015-04-08T02:41:12+5:302015-04-08T02:41:12+5:30
पिस्तूलची तपासणी करीत असलेल्या प्रवाशास लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना दुपारी ४.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केट परिसरात घडली.
नागपूर : पिस्तूलची तपासणी करीत असलेल्या प्रवाशास लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना दुपारी ४.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केट परिसरात घडली. दरम्यान सायंकाळी संबंधित व्यक्तीजवळ पिस्तूलचा परवाना असल्याचे माहीत झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
रामचंद्र जगन्नाथ पांडे (३०) रा. हिरकपूर जि. पन्ना मध्यप्रदेश हा ए.एस. सिक्युरी सिक्युरिटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. वरुण स्वरम शर्मा (३१) रा. जालंधर हे टिंबर मर्चंट आहेत. त्यांनी रामचंद्रच्या सुरक्षा रक्षक कंपनीला संपर्क साधून सुरक्षा रक्षक पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीने रामचंद्रला पाठविले. त्या दोघांची नागपूर रेल्वेस्थानकावर भेट झाली. रामचंद्र आपल्या पिस्तूलची तपासणी करीत होता. परंतु त्याला पिस्तूल व्यवस्थित हाताळता येत नसल्यामुळे त्याने बाजूलाच असलेल्या सीआरपीएफ जवानास पिस्तूल दिले. तेवढ्यात तेथे उपस्थित लोहमार्ग पोलिसांना त्याच्यावर शंका आली. लगेच त्यास पिस्तूल आणि सात राऊंडसह पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या पिस्तूलचा परवाना आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. सायंकाळी उशिरा त्याच्या पिस्तूलचा परवाना असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. रेल्वेस्थानकावर पिस्तूल आढळल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)