नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून महिला मनोरुग्ण पळाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 08:12 PM2018-07-13T20:12:11+5:302018-07-13T20:13:09+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, याकडे आ. तारासिंग यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर संरक्षण भिंतीची उंची वाढविण्यासाठी एक कोटी आठ लाखांचा निधी देण्यात आला. यामुळे सहा-सात फूट उंचीची भिंत बारा फुटाच्याही वर गेली. सामान्य व्यक्तीलाही ही भिंत ओलांडणे अवघड झाले. असे असताना, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत पाचवर रुग्ण पळून गेले. विशेष म्हणजे, यातील चार रुग्ण हे मुख्य प्रवेशद्वारातून पळून गेले. गेल्या महिन्यात दोन रुग्ण तर चक्क रुग्णालयाच्या स्वयंपाकीची दुचाकी चोरून पळून गेले. त्यानंतर या महिन्यात पुन्हा एक ४० वर्षीय मनोरुग्ण पळून गेला. हा रुग्ण दिल्ली येथील एका बड्या घरातील असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, रुग्ण पळून जाणाऱ्या घटनांवर प्रतिबंध बसण्यासाठी व रुग्णांच्या सुरक्षेला घेऊन नुकतेच ३२ लाख रुपये खर्चून रुग्णालयाच्या आत व परिसरात ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे रुग्ण पळून जाण्याच्या घटनांवरून दिसून येते.
प्राप्त माहितीनुसार, पळून गेलेली ३६ वर्षीय महिला मनोरुग्णाला दोन महिन्यांपूर्वी प्रादेशिक मनोरुग्णालयात पोलिसांकडून भरती करण्यात आले. परंतु तिला स्वत:ची माहिती नसल्याने अनोळखी रुग्ण म्हणून तिची नोंद करण्यात आली. रुग्णालयाने तिचे नाव रिता ठेवले होते. वॉर्ड क्र. १७ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ती पळून गेली. वॉर्डाच्या मागील कमी उंचीच्या भिंतीवरून ती पळून गेली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
रुग्ण पळून जाण्याच्या घटना थांबणार कधी?
प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, चौकशी समिती बसविली जाते आणि सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरून त्याला निलंबित केले जाते. त्यानंतर ते प्रकरण बंद पडते. पुन्हा कुणी पळून गेल्यावर हेच चक्र फिरते. परंतु रुग्ण पळून का जातो, या मागील कारण जाणून घेण्यास कुणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने आरोग्य विभागाचे मंत्र्यांपासून ते आयुक्त, सचिव व संचालक नागपुरात आहेत, त्यांनी हा विषय गंभीरतेने घेतल्यास तो कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे.