नागपूरनजीकच्या सुराबर्डीतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 08:09 PM2018-11-29T20:09:25+5:302018-11-29T20:10:47+5:30
मोठ्या भावाने आंतरधर्मीय विवाह केल्याने लहान भावाच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यातूनच त्याने वहिनीला संपविण्याची योजना आखली. तो मोठा भाऊ नसताना घरी आला आणि त्याने वहिनीसोबत हुज्जत घालत तिचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चार वर्षीय चिमुरडीने रडायला सुरुवात केली. तिला समजावण्याऐवजी त्याने तिचाही गळा आवळून खून केला. हे दुहेरी हत्याकांड वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना नजीकच्या सुराबर्डी (तकिया) येथे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालली असून, आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (वाडी ): मोठ्या भावाने आंतरधर्मीय विवाह केल्याने लहान भावाच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यातूनच त्याने वहिनीला संपविण्याची योजना आखली. तो मोठा भाऊ नसताना घरी आला आणि त्याने वहिनीसोबत हुज्जत घालत तिचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चार वर्षीय चिमुरडीने रडायला सुरुवात केली. तिला समजावण्याऐवजी त्याने तिचाही गळा आवळून खून केला. हे दुहेरी हत्याकांड वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना नजीकच्या सुराबर्डी (तकिया) येथे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालली असून, आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आली.
प्रतिभा राकेश बिद (३०) व रागिणी राकेश बिद (४) असे मृत आई व मुलीचे नाव असून, चंद्रशेखर बिद (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी दिराचे नाव आहे. बिद कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील भदोई, जिल्हा गंगारामपूर येथील रहिवासी असून, ते काही वर्षांपासून रोजगारानिमित्त नागपूर परिसरात आले. राकेश बिद हा ट्रेलरचालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. त्याने २००९ मध्ये प्रतिभासोबत प्रेमविवाह केला. ती मुस्लीमधर्मीय असून, उत्तर प्रदेशातील रहिवासी होती.
दरम्यान, प्रतिभाने रागिणी नामक मुलीला जन्म दिला. चंद्रशेखरला मात्र त्यांचा आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता. याच कारणावरून तो राकेश व प्रतिभासोबत नेहमीच भांडणे करायचा. राकेश बाहेरगावी गेल्याचे कळताच तो बुधवारी रात्री त्याच्या घरी गेला. त्याने प्रतिभासोबत भांडण उकरून काढत तिचा गळा आवळला. त्यात ती गतप्राण झाली.
हा सर्व प्रकार रागिणी बघत होती. घाबरल्याने तिने रडायला सुरुवात केली. चंद्रशेखरने दयामाया न दाखविता तिचाही गळा आवळला. त्याने दोघांनाही पलंगावर टाकून तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी काही कामानिमित्त दार ठोठावले असता, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सेवकसिंह गुरुचरण सिंह यांनी वाडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, त्यांना मायलेकीचे मृतदेह आढळून आले. त्यांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
दोघींचाही मृत्यू गुदमरल्याने अर्थात गळा आवळून झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात आढळून आले. त्यातच गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेबाबत चौकशी करीत आरोपी चंद्रशेखरला रात्री उशिरा ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. चंद्रशेखरने गुन्ह्याची कबुली देताच त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रतिभाचे दुसरे लग्न
राकेश व प्रतिभा यांचा प्रेमविवाह असून, हे प्रतिभाचे दुसरे लग्न होय. तिला दोन मुली असून, आस्था नामक मोठी मुलगी तिच्या नातेवाईकांकडे उत्तर प्रदेशात राहते. लग्नानंतर दोघेही वाडी परिसरात किरायाने राहायचे. शिवाय, ती लग्नानंतर प्रतिभा नावाने वावरायची. विशेष म्हणजे, त्यांच्या या लग्नाला राकेशच्या संपूर्ण कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहिती जाणकारांनी दिली.