रेल्वेस्थानकावर बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ
By admin | Published: October 2, 2015 07:30 AM2015-10-02T07:30:55+5:302015-10-02T07:30:55+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाच्या सेकंड क्लास वेटिंग रुममध्ये दुपारी ३.१० वाजता एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या सेकंड क्लास वेटिंग रुममध्ये दुपारी ३.१० वाजता एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी करून बॅगमध्ये कुठलीच संशयास्पद वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ वर आरपीएफच्या बॅग स्कॅनर शेजारी सेकंड क्लास वेटिंग रुम आहे. दुपारी ३ वाजता बऱ्याच वेळापासून या वेटिंग रुममध्ये एक बेवारस सुटकेस ठेवलेली आढळली. या सुटकेसबाबत काही प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात सूचना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना पाचारण केले. लोहमार्ग पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रवाशांना तेथून बाहेर काढले. एक्स रे मशीन, रीना नावाचा श्वान आणि इतर उपकरणांसह तपासणी सुरू केली. थोड्या वेळानंतर त्यांनी या सुटकेसमध्ये कुठलीच संशयास्पद वस्तू नसल्याचे जाहीर केले. ही सुटकेस छिंदवाडा येथील समीर पाल नावाच्या पत्रकाराची असल्याचे त्यात आढळलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. ही कारवाई लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक धर्मदीप इंगळे, मनोज गुप्ता, देवेंद्र जुमनाके, सुनील शुक्ला, अरुण साळवे, गौरव भोयर, प्रशांत इंगोले, अविनाश नारनवरे, जयंत नांदेडकर यांनी पार पाडली. आॅक्टोबर महिन्यात विजयादशमीनिमित्त प्रवाशांची संख्या रेल्वेस्थानकावर वाढणार आहे. त्यामुळे ‘बीडीडीएस’ पथकाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)