वन विभागात खळबळ : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बिबट्याने केली काळवीट, चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:26 PM2019-02-06T21:26:46+5:302019-02-06T21:27:46+5:30
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्यावतीने देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्यावतीने देण्यात आली.
बुधवारी सकाळी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला बिबट्याने ठार केल्याची घटना उघडकीस आली. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला इलेक्ट्रॉनिक तारेचे कुंपण आहे. हे कुंपण ओलांडून बिबट्याने १५ फूट पिंजऱ्यात शिरून काळवीटासह चितळ आणि चौसिंग्याला ठार केल्यामुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गोरेवाडाचे विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे यांनी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यामुळे ही घटना घडल्याचे मान्य केले. नेमक्या काय त्रुटी राहिल्या याचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. डिसेंबर २०१५ मध्ये गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १४ एप्रिल २०१६ मध्ये बिबट्याने आत प्रवेश करून तीन काळवीटांची शिकार केली होती. अशा घटना घडू नयेत यासाठी जानेवारी २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक फेन्सिंग (जाळी) लावण्यात आली होती. परंतु त्यानंतरही बिबट्याने आत प्रवेश करून हरिणांची शिकार केली. कुंपणात कुठे फट राहिली की बिबट्याला कुंपणावरून आत उडी मारण्यासाठी उंच जागा मिळाली याचा तपास करून त्यातील त्रुटी दूर करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. इलेट्रॉनिक फेन्सिंग करताना ‘एनटीसीए’च्या अटींचे पालन करण्यात आले असून कोणत्याच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात आले. शवविच्छेदनात चार चितळ, तीन काळवीट व एका चौसिंग्याचा मृत्यू श्वसन व हृदयक्रिया बंद पडल्यामुळे आणि एका काळविटाच्या शरीराचा बराच भाग खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या मृत प्राण्यांना दफन करण्यात आले. ही कारवाई गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, वन्य प्राणी बचाव केंद्राचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे, वनपाल पी. एम. चौहान, वनरक्षक आर. एच. वाघाडे, डॉ. व्ही. एम. धूत, डॉ. पी. एम. सोनकुसळे, डॉ. शालिनी, डॉ. एम. डी. पावशे, डॉ. एस. एम. कोलंगथ यांनी पार पाडली.