खळबळ : पुलगावच्या तरुणाचे नागपुरातून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:18 PM2018-02-01T16:18:07+5:302018-02-01T16:21:37+5:30
नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनूप चंद्रकांत मिरगे (वय ३४) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने नागरिकांकडून मोठी रक्कम गोळा केली आणि अनेकांची फसवणूक करून तो पसार झाल्याचा आरोप आहे. तो नागपुरात कॉटन मार्केटजवळच्या हॉटेलमध्ये दडून बसल्याची माहिती त्याला रक्कम देणा-यापैकी काहींना मिळाली. त्यावरून बुधवारी रात्री ११ च्या सुमारास चार आरोपी हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी रुम नंबर १०५ मध्ये असलेल्या अनुप मिरगेला बेदम मारहाण केली. ‘नोकरीचे आमिष दाखवून रक्कम घेतो आणि नोकरी लावून देत नाही. पैसेही परत करीत नाही अन् पळून जातो,’ असा आरोप करून त्याला मारतच हॉटेलबाहेर काढले. ते पाहून हॉटेलचे व्यवस्थापक, कर्मचारी तसेच श्रीकांत राजू लांडगे (वय ३१, रा. सदर) यांनी आरोपींना रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना न जुमानता आरोपींनी त्याला आपल्या वाहनात (एमएच ३१/ डीके ०४६०) मध्ये बसवून पळवून नेले.
मिरगे सापडला
अपहरणाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लांडगे यांनी दिलेल्या माहितीवरून गणेशपेठचा पोलीस ताफा हॉटेलमध्ये पोहचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना तपासताना मिरगेचा एक साथीदार पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मिरगेची पत्नी चंद्रपूरला राहते, तिला भेटून तो दोन दिवसांपासून या हॉटेलमध्ये येत जात आहे, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अधिक बोलते केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी रात्रभर ईकडे तिकडे शोधाशोध करून पहाटेच्या वेळी अपहृत मिरगेसह चार संशयीतांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.