संशयास्पद व्यक्तींच्या हॉटेलभेटीने खळबळ
By admin | Published: February 23, 2016 03:26 AM2016-02-23T03:26:46+5:302016-02-23T03:26:46+5:30
वर्धा मार्गावरील एका बड्या हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी दोन व्यक्ती येतात. रिसेप्शनिस्ट त्या आगंतुकांचे औपचारिक स्वागत करते.
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
वर्धा मार्गावरील एका बड्या हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी दोन व्यक्ती येतात. रिसेप्शनिस्ट त्या आगंतुकांचे औपचारिक स्वागत करते. त्यांना रूम हवी असावी, असा रिसेप्शनिस्टचा अंदाज असतो. मात्र, तो फोल ठरतो. ‘हम दिल्ली के पुलीस अफसर है’, असे सांगत ते दोघे रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांना असंबद्ध माहिती विचारतात. ‘राकेश’ची चौकशी करतात अन् हॉटेलचे रजिस्टरही ताब्यात घेतात. सैरभर रजिस्टरच्या नोंदी तपासतात अन् हॉटेल प्रशासनाला संशय आल्याचे लक्षात येताच भरभर निघूनही जातात.
दहशतवादी, नक्षलवाद्यांचे टार्गेट असलेल्या नागपुरात रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे ‘ते’ दोघे कोण होते, कुठून आले अन् कुठे गेले, याची पोलीस यंत्रणा कसून चौकशी करीत आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमध्ये रविवारी दुपारी दोन तरुण आले.
‘आम्ही दिल्ली पोलीस दलातील अधिकारी आहोत’ असा परिचय देत त्यांनी हॉटेलच्या वरिष्ठांना ‘राकेश’ नामक तरुणाबाबत विचारणा केली. कोण राकेश, कुठला राकेश अशा प्रश्नांच्या सरबत्तीनंतर त्यांनी हॉटेलमध्ये चौकशी (झडती) केली. हॉटेलचे रजिस्टरही चेक केले. ते असंबंध माहिती विचारत असल्यामुळे हॉटेल प्रशासनाला संशय आला. त्यामुळे त्यांनी ‘त्या’ कथित अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवायला सांगितले.
त्यांनी दिल्ली पोलीसचे ओळखपत्रही दाखवले. मात्र, ते काहीसे कचरले अन् घाईगडबडीने निघून गेले. दरम्यान, त्यांचे एकूणच वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोनेगाव पोलिसांना माहिती देऊन बोलवून घेतले.
दुपारी ३ च्या सुमारास सोनेगाव पोलिसांचा ताफा हॉटेलमध्ये पोहचला. तत्पूर्वीच ‘ते’ दोघे हॉटेलमधून निघून गेले होते. त्यामुळे हॉटेलमध्ये जाणाऱ्या पोलिसांनी हे प्रकरण फारसे गंभीरपणे घेतले नाही. वरिष्ठांनाही कळविले नाही.
गुन्हे शाखा आयुक्तांकडून दखल
४रविवारी रात्री ही माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना कळली. त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत लगेच गुन्हेशाखेचा ताफा हॉटेलमध्ये पाठवला. गुन्हेशाखेच्या पथकाने हॉटेल प्रशासनाकडे ‘त्या’ दोघांविषयी सविस्तर चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमध्ये जाणाऱ्या सोनेगाव ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्याकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘त्या’ दोघांबाबत नव्याने चौकशी सुरू झाली.
४सोनेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी सोमवारी दुपारी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या दोघांची छायाचित्रे तपासली. मात्र, फुटेज धूसर (अस्पष्ट) असल्यामुळे ते दोघे कोण होते, ते स्पष्ट होऊ शकले नाही. कोणताही वरिष्ठ तपास अधिकारी दुसऱ्या ठिकाणी जाऊन थेट आपला परिचय देत नाही किंवा लगबगीने निघूनही जात नाही. त्याचमुळे ‘त्यांचे’ येणे आणि जाणे जास्त संशयास्पद ठरले आहे.
संवेदनशील पार्श्वभूमी
४देशभरात अनेक ठिकाणी झालेल्या घातपाती घटनांमध्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. भारताविरोधी घोषणा देण्याचे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणाने देशविदेशात खळबळ उडवली, या बहुचर्चित प्रकरणाचे नागपूर कारागृहात बंदिस्त असलेल्या प्रो. साईबाबाशी थेट कनेक्शन असल्याचा संशय आहे. याच प्रकरणातील उमर खालिद नामक आरोपीने नागपूर-गडचिरोलीची वारी केल्याचे उघड झाले आहे. नागपूर दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर अव्वलस्थानी आहे. हॉटेलच्या बाजूलाच विमानतळ आहे. या सर्व संवेदनशील बाबींमुळे ‘त्या’ दोन संशयितांची ओळख पटणे गरजेचे झाल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.