खळबळजनक खुलासा; वाघाच्या बछड्याची हत्या पैशाचा पाऊस पाडण्याच्या लालसेतूनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 10:04 PM2021-10-11T22:04:55+5:302021-10-11T22:05:25+5:30
आकाशातून पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून दोन युवकांनी १० दिवसांच्या एका वाघाच्या बछड्याची शिकार केली.
नागपूर : आकाशातून पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून दोन युवकांनी १० दिवसांच्या एका वाघाच्या बछड्याची शिकार केली. यासाठी त्याला पकडून घरी नेले. नंतर घराजवळच क्रूरपणे हत्या केली. हा आगळावेगळा प्रकार वन विभागाच्या तपासात पुढे आला आहे. आरोपींचे बयान ऐकून तपासकर्ते अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. अंधश्रद्धेतून केलेल्या अघोरी पूजेनंतरही पैशाचा पाऊस तर पडला नाहीच, उलट या दोघांनाही कारागृहाची हवा मात्र खावी लागली.
लोमेश (चिंचबोडी) आणि कालिदास (दर्यापूर) अशी या आरोपींची नावे आहेत. या घटनेचा खुलासा ५ महिन्यांनंतर झाला. लोमेशचे वडील अघोरी पूजेवर विश्वास ठेवणारे आहेत. अंधश्रद्धेतून ते अनेक प्रकारची पूजा करतात, अशी सूत्रांची माहिती आहे. या अंधश्रद्धेतूनच मुलगा लोमेश आणि मित्र कालिदास यांनी वाघाच्या बछड्याला मारले. त्याचे शव पुढे ठेवून एकांतात अघोरी पूजा केली. मात्र पैशाचा पाऊस पडलाच नाही.
पूजेत अपयश आल्याने त्यांनी बछड्याच्या शवाची विक्री करण्याची योजना आखली. खबऱ्यांकडून याची माहिती वन विभागापर्यंत पोहोचली. यावरून सापळा रचून त्यांना पकडण्याची योजना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आखली.
आरोपींनी बछड्याच्या शवाची किंमत २० लाख रुपये ठेवून ग्राहकाला विकण्याची तयारी दर्शविली. ६ ऑक्टोबरला या दोघांनाही ग्राहकाने बछड्याच्या शवासह एमआयडीसीमध्ये बोलावले. मात्र आरोपींना असुरक्षित वाटल्याने त्यांनी ग्राहकाला चंद्रपुरातील पडोलीमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे सापळा रचला गेला. त्यात दोघेही पुराव्यासह अडकताच त्यांना अटक करण्यात आली.
घटनेमागे टोळी नाही
एका ज्येष्ठ वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निव्वळ अंधश्रद्धेतून बछड्याची शिकार केली. पूजेनंतरही हेतू साध्य न झाल्याने त्याचे शव सांभाळून ठेवले. ते विकून पैसा मिळविण्याच्या प्रयत्नात ते वन विभागाच्या हाती लागले. या प्रकरणात टोळीचा संबंध दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
...