नागपूर पोलिसांचा संवेदनशील चेहरा, सामन्याच्या पासेस अनाथ विद्यार्थ्यांना
By योगेश पांडे | Published: September 23, 2022 06:10 PM2022-09-23T18:10:55+5:302022-09-23T18:13:23+5:30
दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना पासेस देण्यात आल्या.
नागपूर : एरवी जनतेसमोर पोलीस अधिकाऱ्यांचा कडक व शिस्तीत असलेला चेहरा येतो, मात्र शुक्रवारी पोलिसांचा संवेदनशील चेहरादेखील अनुभवण्यास मिळाला.भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान नागपुरातील जामठा मैदानावरील दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याच्या तिकीटांसाठी लोक अक्षरशः पायपीट करत होते. मात्र नागपूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या कॉर्पोरेट बॉक्सेस व स्टॅंडच्या पासेस अनाथ विद्यार्थ्यांना देत त्यांना सामना याची देही याची डोळा पाहण्याची संधी दिली व एक आदर्श प्रस्थापित केला.
नागपूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांना सामन्याची काही तिकीटे किंवा पासेस मिळत असतात. पोलीस अधिकारी तर कर्तव्यावर असतात. त्यामुळे त्यांचे नातेवाईक किंवा निकटवर्तीयांना ती पासेस सामान्यतः ते देतात. मात्र यंदा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या जवळील पासेस अनाथ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. ही बाब ज्यावेळी इतर अधिकाऱ्यांना समजली, तेव्हा त्यांनीदेखील पोलीस आयुक्तांच्या या पावलाचे समर्थन करत त्यांच्याजवळील पासेस इतर अनाथ विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले. दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना पासेस देण्यात आल्या.
म्हणून घेतला पोलीस आयुक्तांनी निर्णय
सर्वसाधारणतः सामन्याच्या दिवशी पोलीस अधिकारी तर बंदोबस्तावर असतात. त्यामुळे त्यांना आलेल्या पासेस या नातेवाईक किंवा मित्रांना दिल्या जातात. इतर पोलीस कर्मचारी तासनतास कर्तव्यावर असतात. अशा स्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पासेसवर सामना पाहणे नैतिकतेला पटत नाही. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना तिकीटे देऊन त्यांना एक प्रेरणा घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.