नागपूर रेल्वेस्थानकावर बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:48 AM2020-11-27T00:48:31+5:302020-11-27T00:51:41+5:30
Mock drill, Nagpur railway station दुपारी ३ ची वेळ रेल्वेस्थानकावरील आरपीएफ ठाण्याशेजारील दुचाकीच्या पार्किंगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. लगेच नियंत्रण कक्षाने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. पथक पार्किंग परिसरात पोहोचले. बॅगची तपासणी केली असता त्यात काहीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुपारी ३ ची वेळ रेल्वेस्थानकावरील आरपीएफ ठाण्याशेजारील दुचाकीच्या पार्किंगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. लगेच नियंत्रण कक्षाने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. पथक पार्किंग परिसरात पोहोचले. बॅगची तपासणी केली असता त्यात काहीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तपासानंतर ही मॉक ड्रील असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ३ वाजता एक व्यक्ती लोहमार्ग पोलीस ठाण्यात आला. त्याने आरपीएफ ठाण्याशेजारील दुचाकीच्या पार्किंग परिसरात एक बेवारस बॅग पडून असल्याची माहिती दिली. बॅगमध्ये बॉम्ब असू शकतो अशी शंका आल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्वरित याची सूचना नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली. बीडीडीएसचे सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, राजेश पंडित, जगन घोगेवार, ऋषिकांत राखुंडे, राहुल गवई, भावेश राणे, समीर खाडे, मनोज बोराडे, चेतन बोडके, लीना आष्टनकर, श्वान हस्तक सुनिता रवराळे, अमित दिवट्टेलवार, श्वानयोद्धा टायगर आदींचे पथक अवघ्या १३ मिनिटात नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. तोपर्यंत पार्किंग परिसरातून सर्वांना सुरक्षितरीत्या इतरत्र हलविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वानाच्या मदतीने दुचाकीच्या खाली असलेल्या बॅगची पाहणी केली असता श्वानाने कुठलाही इशारा दिला नाही. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे असल्याचे समजले. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाणे नागपूरला माहिती देऊन बॅग त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. तोपर्यंत रेल्वेस्थानकावरील प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासाअंती ही मॉक ड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच लोहमार्ग पोलिसांमधील समन्वय कसा आहे, हे तपासण्यासाठी या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते.