नाटकातील ते वाक्य खरे ठरले! ट्रम्पना धडकी भरविण्यात सिंहाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 01:06 PM2020-11-10T13:06:18+5:302020-11-10T13:07:06+5:30
Nagpur News ‘आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पला धडकी भरवेल, हे निश्चित. ’ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगदी जानेवारी २०२० पासूनच ‘श्री २०२०’ हे कॅम्पेन बॅनर अमेरिकेतील मिशिगन-डिट्रॉयटसह महाराष्ट्रात खूप गाजले. तेथील राष्ट्राध्यक्षपदासाठी ज्या ५३८ सिनेटर्सची भूमिका महत्त्वाची होती, त्या निवडणुकीत हे कॅम्पेन महत्त्वाचे ठरले आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून ९३ टक्के मत घेत निवडूनही आले. अमेरिकेत त्यांना श्री या नावानेच ओळखले जाते, ते श्रीनिवास ठाणेदार यांचा नागपूरशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. १६ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने ते नागपूरला आले आणि त्यांच्या चरित्राचे नाट्य रूपांतरण झाले. या नाटकाच्या अखेरचे संवाद होते ‘आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पला धडकी भरवेल, हे निश्चित. ’ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले आहे.
जागतिक मराठी अकादमीच्या ४ ते ६ जानेवारी २०१९ रोजी नागपुरात पार पडलेल्या १६ व्या ‘जागतिक मराठी संमेलना’चे ते अध्यक्ष होते. याच संमेलनात त्यांच्या ‘ही श्रींची इच्छा’ या आत्मचरित्राच्या ५० व्या आवृत्तीचे आणि आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘पुन्हा श्रीगणेशा’च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. हे संमेलन पार पडले, पण नागपूरचे संबंध तुटले नाही.
संमेलनात येथील हौशी रंगकर्मींची झालेली औटघटकेची भेट नंतर दृढ झाली आणि आपल्या चरित्राचे नाट्य रूपांतरण करण्याची जबाबदारी येथीलच कलावंतांवर सोपवली. ‘बायोपिक श्री’हे नाटक बघण्यासाठी ते खास नागपूरला आले आणि अगदी व्हरांड्यात सादर केलेल्या नाटकातील आपला प्रवास बघून त्यांचे डोळे पाणावले.
रंगकर्मींचे भरभरून कौतुक करत त्यांनी ही भेट इथेच संपणार नाही. रंगमंचासाठी ही भेट निरंतर होत राहील, असे आश्वासनही दिले.
निवडणूक आणि नाटकाचा वाद
श्री ठाणेदार निवडणुकीत उभे राहणार म्हणून मिशिगनमधील जॅक किंग नावाच्या नाटककाराने त्यांच्या विरोधात आगडोंब भडकविण्याचा प्रयत्न केला होता. ‘बायोपिक श्री’विरोधातही अर्वाच्य भाषेत टीका केली होती. मात्र, हा ठाणेदारांविराेधात निवडणूक स्टंट असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तेथील मतदारांनी जॅक किंगला भावच दिला नाही, हे विशेष.
माझे मराठी-हिंदी चित्रपट-नाटक क्षेत्रातील कलावंतांशी जवळचे संबंध आहेत. त्यांना मी अमेरिकेत आमंत्रितही करीत असतो. मात्र, नागपुरातील रंगकर्मींमध्ये जो स्पार्क दिसला त्याने मी भारावून गेलो. हौशी रंगभूमीचा आणि अमेरिकेतील अतिशय संपन्न ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे, ऑफ ऑफ ब्रॉडवे रंगभूमीसंदर्भात सेतू निर्माण करता येऊ शकतो, असे मला वाटते.
- श्रीनिवास ठाणेदार, स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, मिशिगन लेजिस्लेटिव्ह हाऊस
आम्ही ज्यांच्या चरित्रावर नाटक केले आणि प्रत्यक्ष त्यांच्यासमोरच सादर केले, असे श्रीनिवास ठाणेदार सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकन संसदेत निवडून गेले, याचा अभिमान वाटतो. ‘बायोपिक श्री’ हे त्यांचे चरित्र आहे आणि काही करण्यात आलेली भाकिते खरी ठरत आहेत, याचा आनंद आहे.
- जयंत बन्लावार, दिग्दर्शक (संस्थापक - हेमेंदू रंगभूमी)