फाशीची शिक्षा सुनावली, पण १७ क्रूरकर्म्यांना कधी लटकावणार? सर्व कैदी नागपुरात, एकाची दया याचिकाही फेटाळली गेली
By नरेश डोंगरे | Published: May 19, 2024 02:24 PM2024-05-19T14:24:39+5:302024-05-19T14:25:05+5:30
मुंबई बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमन याला नऊ वर्षांपूर्वी अर्थात ३० जुलै २०१५ रोजी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
नागपूर : अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांतील सामूहिक हत्याकांडाचे निकाल आठ दिवसांत लागले. दोन प्रकरणांतील नराधमांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर दोन वर्षांत नागपुरातील दोन क्रूरकर्म्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एकूण १७ फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी ? हा प्रश्न चर्चेला आला आहे.
शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावलेल्या अकोला जिल्ह्यातील आरोपींची नावे हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) अशी असून, ते अकोटमधील आहेत.
तिहेरी हत्याकांड प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील किशोर शेंडे (४२) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली आहे.
फाशी यार्डात तिघांची भर पडणार
राज्यात फाशी देण्याची व्यवस्था असलेले दोनच कारागृह आहेत. एक पुण्याचा येरवडा, तर दुसरा नागपूरचा मध्यवर्ती कारागृह. नागपूरच्या कारागृहातील यार्डात सध्या फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले १४ आरोपी आहेत. अकोल्यातील आरोपींनाही येथे आणले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंमलबजावणी नऊ वर्षांपूर्वी