शिक्षा सुनावली, क्रूरकर्म्यांना फासावर कधी टांगणार?

By नरेश डोंगरे | Published: May 18, 2024 07:01 PM2024-05-18T19:01:33+5:302024-05-18T19:01:55+5:30

महाराष्ट्रात फाशीची शिक्षा ठोठावलेले १७ कैदी नागपुरात : एकाची दया याचिकाही राष्ट्रपतींकडून फेटाळली गेलेली

Sentencing, when will the brutal criminals be hanged? | शिक्षा सुनावली, क्रूरकर्म्यांना फासावर कधी टांगणार?

Sentencing, when will the brutal criminals be hanged?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भाची दोन टोकं असलेल्या अकोला आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या सामुहिक हत्याकांडांचे निकाल गेल्या आठ दिवसांत लागले. या दोन्ही प्रकरणातील नराधमांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तर, दोन वर्षांत नागपुरातील दोन क्रूरकर्म्यांनाही अशाच प्रकारची फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने शिक्षा जरी ठोठावली तरी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावलेल्या अकोला जिल्ह्यातील आरोपींची नावे हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४), अशी असून ते सर्व अकोट येथील रहिवासी आहेत.

शेतीच्या वादातून दोन भाऊ बाबूराव सुखदेव चऱ्हाटे (वय ६०), धनराज सुखदेव चऱ्हाटे (५०) तसेच त्यांची मुले शुभम आणि गाैरव या चाैघांची २८ जून २०१५ ला आरोपींनी नृशंस हत्या केली होती. या प्रकरणात आरोपींचे क्राैर्य बघता जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी तीनही आरोपींना फाशीची सुनावली.

दुसरे तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील होय. संशयाच्या भुताने झपाटलेला आरोपी किशोर श्रीराम शेंडे (४२, रा. भिवापूर, तिरोडा) याने त्याची पत्नी आरती (३०), चार वर्षीय मुलगा जय शेंडे आणि आरतीचे वडील देवानंद मेश्राम (५२) या तिघांना जाळून ठार मारले होते. गोंदिया शहरात १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती एन बी लवटे यांनी ९ मे २०२४ ला फैसला सुनावताना आरोपी किशोर श्रीराम शेंडे याला मरेपर्यंत फासावर टांगण्याची शिक्षा सुनावली.

तिसऱ्या एका नंदनवन मधील प्रकरणात क्रूरकर्मा विवेक पालटकर याला पाच जणांच्या हत्येप्रकरणी दोन वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा ठोठावली. गेल्या वर्षी उच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम ठेवली.

विशेष म्हणजे, या तीनही प्रकरणांपूर्वी वाडी येथील एका चिमुकलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालायने आरोपी वसंता दुपारेला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याची ती शिक्षा नंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही जैसे थे ठेवली. एवढेच काय गेल्या वर्षी मे महिन्यात दुपारेची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली. एवढे होऊनही त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यामुळे ही फाशी लांबली आहे.

फाशी यार्डात सध्या १४, आणखी तिघांची भर पडणार

महाराष्ट्रात फाशी यार्ड अर्थात आरोपीला फाशी देण्याची व्यवस्था असलेले दोनच कारागृह आहेत. एक पुण्याचा येरवडा तर दुसरा नागपूरचा मध्यवर्ती कारागृह. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्डात सध्या फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले १३ पुरूष आणि १ महिला असे एकूण १४ आरोपी आहेत. अकोला येथील आरोपींना नागपूर कारागृहात आणले जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात फाशीची अंमलबजावणी ९ वर्षांपूर्वी
मुंबई बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद ईब्राहिमचा साथीदार याकूब मेमन याला ९ वर्षांपूर्वी अर्थात ३० जुलै २०१५ ला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

 

Web Title: Sentencing, when will the brutal criminals be hanged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.