दंत-नेत्र तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
By admin | Published: May 25, 2016 02:57 AM2016-05-25T02:57:55+5:302016-05-25T02:57:55+5:30
भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्य महाशिबिरात दररोज नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
भाजपा आरोग्य महाशिबिर : २७ मेच्या टोकन वितरणाला सुरुवात
नागपूर : भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्य महाशिबिरात दररोज नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिबिरात दंत तपासणी व नेत्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने, यासाठी स्वतंत्र नोंदणी व तपासणीची व्यवस्था मंगळवारपासून करण्यात आली आहे.
मंगळवारी आरोग्य महाशिबिराला खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, सहकार आघाडीचे अध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, भोजराज दुबे, किशोर पलांदूरकर यांनी हजेरी लावली. तसेच या ठिकाणी असलेल्या योग्य नियोजन आणि व्यवस्थेमुळे संयोजक संदीप जोशी व सहसंयोजक प्रकाश भोयर यांचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २१ मेपासून शिबिराला सुरुवात झाली आहे. बी.आर. मुंडले सभागृह, दीक्षाभूमीजवळ नागरिकांना २६ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शिबिराचा लाभ घेता येईल. तसेच याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी काऊंटर सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान सुरू ठेवण्यात आले आहे.
शिबिरात नेत्ररोग तपासणी, अस्थिव्यंग्योपचार, सामान्य सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, जनरल मेडिसीन, दंतरोग, पॅथालॉजीसह सर्व आजारांची तपासणी, उपचार करण्यात येत आहेत. नागरिकांनी टोकन घेण्यासाठी सकाळी ८.३० पासूनच शिबिरस्थळी येण्यास सुरुवात केली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कुणाचीही गैरसोय झाली नाही.
शिबिरस्थळी तपासणीसोबतच औषध पूर्णपणे नि:शुल्क मिळत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्या हजार रुग्णांची नोंदणी सुमारे ११ वाजताच पूर्ण झाली होती. तरी नागरिकांची काळजीकरिता आयोजकांनी २७ मे रोजीच्या शिबिराच्या टोकन वाटपास सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)