वेगळ्या विदर्भाचा ठराव पारित
By admin | Published: February 18, 2017 02:29 AM2017-02-18T02:29:52+5:302017-02-18T02:29:52+5:30
संयुक्त महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे असा ठराव स्थानिक नगर परिषदेत बहुमताने पारित करण्यात आला.
काटोल नगर परिषद : काटोल जिल्ह्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे एकमत
काटोल : संयुक्त महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे असा ठराव स्थानिक नगर परिषदेत बहुमताने पारित करण्यात आला. यासोबतच काटोल जिल्हा व्हावा आणि इतर तीन ठराव पारित करण्यात आले. काटोल नगर परिषदेत बहुमतात असलेल्या विदर्भ माझा पक्षाने हा ठराव पारित केल्याने पुन्हा एकदा ‘वेगळ्या विदर्भा’च्या मुद्यावर वातावरण निर्मिती होत आहे.
नगर परिषदेत विदर्भ माझा पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांनी पदभार स्वीकारताच विशेष सभा घेऊन वेगळ्या विदर्भाचा ठराव घेण्यात येईल, असे पहिल्याच सभेत सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. १७) हा ठराव मांडण्यात येऊन तो पारित करण्यात आला. सत्तारूढ गटाचे नगरसेवक देवीदास कठाणे यांनी हा ठराव मांडला. वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडताना त्यांनी विदर्भाला माँ जिजाऊपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतांची परंपरा लाभलेली आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा लाभलेल्या विदर्भाने आपले वेगळेपण जपले आहे. विदर्भात विपूल प्रमाणात खनिज संपत्ती, वनवैभव आहे. मोठ्या प्रमाणात येथे ऊर्जा निर्मिती होते.
संत्रा, कापूस हे मुख्य पीक असलेल्या विदर्भाची भौगोलिक स्थिती पाहता व जनभावना लक्षात घेता वेगळे विदर्भ राज्य करण्यात यावे, असे या ठरावात नमूद करण्यात आले. त्याला नगरसेवक हेमराज रेवतकर यांनी दुजोरा दिला. स्वतंत्र विदर्भाचा ठराव हा बहुमताने पारति करण्यात आला. विरोधी गटाचे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक, गटनेते संदीप वंजारी व इतर तीन अशा चार नगरसेवकांनी संयुक्त महाराष्ट्राचे समर्थन करीत वेगळ्या विदर्भाला विरोध केला. उर्वरित विदर्भ माझाच्या सर्वच १९ सदस्यांनी ठरावाचे समर्थन केले. त्यामुळे हा ठराव १९ विरुद्ध ४ असा बहुमताने नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांनी पारित केला. यानंतर काटोल जिल्हा व्हावा यासाठी ठराव घेण्यात आला. त्याला विदर्भ माझा पक्षाच्या नगरसेवकांसह शेकापच्या नगरसेवकांनीही समर्थन दिले. त्यामुळे तो ठराव एकमताने पारित झाला. यावेळी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेते चरणसिंग ठाकूर, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवालेंसह इतर नगरसेवक उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित करणारी ही बहुधा पहिलीच न. प. आहे. (तालुका प्रतिनिधी)
भाजपची विशेष सभेकडे पाठ
नगर परिषदेत विदर्भ माझाच्या नगराध्यक्ष वैशाली ठाकूर आणि विदर्भ माझाचे १८ नगरसेवक निवडून आले. शेकापचे चार तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला. विदर्भ माझाकडे असलेले १९ हे संख्याबळ स्वीकृत सदस्य निवडीनंतर २१ झाले. पहिल्या सभेतच स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला विदर्भ माझा पक्षाच्या नगरसेवकांसह विरोधी गट असलेल्या शेकापचेही सर्वच सदस्य हजर होते. परंतु विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या एकमेव सदस्याने सभेकडे पाठ फिरविली. गैरहजर राहण्याचे कारण कोणतेही असले तरी स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भाजपचाच सदस्य सभेला गैरहजर राहतो, याबाबत उलटसुलट चर्चेला काटोलमध्ये उधाण आले आहे.