काटोल येथे लवकरच विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:49+5:302021-04-24T04:08:49+5:30
काटोल : तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विलगीकरण केंद्राची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर माजी ...
काटोल : तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विलगीकरण केंद्राची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी शुक्रवारी काटोल पंचायत समिती येथे खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. यात काटोल शहरातील तिरूपती सभागृहात तातडीने विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रावर शहरातील डॉक्टर रोज एक तास सेवा देतील. या केंद्रासाठी जो खर्च येईल तो प्रशासनाच्या माध्यमातून तसेच आमदार निधीतून करण्याचे आदेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले. हे केंद्र सुरू झाल्यानंतर ज्या कोरोनाग्रस्तांच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही, येथे त्यांची राहण्याची व्यवस्था होईल. यासोबतच डॉक्टरांच्या देखरेखीत रुग्णावर योग्य उपचार होतील. याचा कोरोना साखळी खंडित करण्यास फायदा होईल, असे देशमुख यांनी सांगितले. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यास नागरिकांनीसुद्धा सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, नायब तहसीलदार नीलेश कदम, नायब तहसीलदार जंगले, नायब तहसीलदार कमलेश कुंबरे, डॉ. भुतडा, डॉ. काळवीट, डॉ. चिंचे, डॉ. घोडे, डॉ. व्यवहारे, डॉ. गोतमारे, डॉ. अग्रवाल, डॉ. ढोबळे, डॉ. अमोदकर, डॉ. रेवतकर, डॉ. नागपूरकर, डॉ. नाकाडे, डॉ. राठी, डॉ. डवरे आदी उपस्थित होेते.