सप्टेंबर ठरला दु:खहर्ता; शहरात एकही मृत्यू नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 12:57 PM2021-10-03T12:57:21+5:302021-10-03T13:05:18+5:30
सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. तर, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे.
नागपूर : गणेश उत्सवाच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. विशेष म्हणजे, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोेजी आढळून आला. या महिन्यात मृत्यूची नोंद नव्हती. परंतु, एप्रिल २०२० पासून रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या वाढत गेली. या महिन्यात १२३ रुग्ण व २ मृत्यू झाले होते. सप्टेंबर २०२० मध्ये ४८,४५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १४०६ मृत्यू झाले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील ही सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची संख्या होती. परंतु, त्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये २७३ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. सध्या कोरोना रुग्णांत घसरण दिसून येत आहे. परंतु, दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहे. यामुळे धोका टळला नाही. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहे.
३० दिवसांत तपासले ४,८१,६६१ नमुने
सप्टेंबर महिन्यात रोज ४ ते ५ हजारांदरम्यान कोरोना संशयिताचे नमुने तपासले जात होते. या ३० दिवसांत ४,८१,६६१ नमुने तपासण्यात आले. यात २७३ नमुने पॉझिटिव्ह आले. २६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ३१ ऑगस्ट रोजी कोरोनाचे ६६ रुग्ण सक्रिय असताना ३० सप्टेंबर रोजी ही संख्या वाढून ७३ वर पोहोचली.
४ नव्या रुग्णांची भर
नागपूर जिल्ह्यात शनिवारी ४ नव्या रुग्णांची भर पडली. यात शहरातील २, जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. सलग दुस-या दिवशी ग्रामीणमध्ये रुग्णांची नोंद झाली नाही. मागील १६ दिवसांपासून मृत्यूची संख्या स्थिर आहे. २४ तासांमध्ये ४०६५ चाचण्या झाल्या. यात शहरातील ३१३९ तर ग्रामीणमधील ९२६ चाचण्या आहेत. आज १४ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १३, ग्रामीणमधील १ आहे. सध्या शहरात ४७, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्ह्याबाहेरील ५ असे ६१ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत.
९ महिन्यांतील मृत्यूची स्थिती
जानेवारी : २२४
फेब्रुवारी : १८१
मार्च : ७६३
एप्रिल : २२९०
मे : १५१४
जून १२३
जुलै : १६ (वाढीव १०९१)
ऑगस्ट : ३
सप्टेंबर : १