सिरियल किलर छल्ला कारागृहातून चालवितो टोळी : साथीदारांमार्फत साक्षीदारांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 08:32 PM2019-01-19T20:32:38+5:302019-01-19T20:33:50+5:30

हत्येच्या चार गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे करणारा खतरनाक गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश धृपसिंग चौधरी हा कारागृहातून त्याची टोळी संचालित करीत आहे. कारागृहातून बाहेर आलेले त्याच्या टोळीतील गुंड छल्लाच्या गुन्ह्यात साक्षीदार असणारांना जीवे मारण्याची धमकी देताना पकडले गेले. त्यावरून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Serial killer operate gang from jail: Threatens witnesses through aides | सिरियल किलर छल्ला कारागृहातून चालवितो टोळी : साथीदारांमार्फत साक्षीदारांना धमकी

सिरियल किलर छल्ला कारागृहातून चालवितो टोळी : साथीदारांमार्फत साक्षीदारांना धमकी

Next
ठळक मुद्देनागपुरात दोघांना अटक, साक्षीदारांची नावे, मोबाईल नंबरची चिठ्ठी जप्त , इतरांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्येच्या चार गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे करणारा खतरनाक गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश धृपसिंग चौधरी हा कारागृहातून त्याची टोळी संचालित करीत आहे. कारागृहातून बाहेर आलेले त्याच्या टोळीतील गुंड छल्लाच्या गुन्ह्यात साक्षीदार असणारांना जीवे मारण्याची धमकी देताना पकडले गेले. त्यावरून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
आरोपी छल्लाने २३ ऑक्टोबर २०१७ ला मोहम्मद अरमान (वय १३) याचे अपहरण करून त्याला इतवारी रेल्वेस्थानकाजवळच्या झुडूपात नेले होते आणि तेथे त्याची निर्घृण हत्या केली होती. क्रूरकर्मा छल्लाने अरमानचे शीर आणि धड वेगवेगळे केले होते. लकडगंज पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने अशाच प्रकारे नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची हत्या केल्याची कबुली दिली. त्या दोघांपैकी एक १५ वर्षीय मुलगा होता. छल्लाने पुन्हा एक हत्या केल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. अशा प्रकारे चौघांची हत्या करणारा छल्ला सध्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. लकडगंजमधील अपहरण करून हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात त्याची गुरुवारी १७ जानेवारीला तारीख होती. यात साक्षीदार असलेल्या व्यक्तीच्या घरी छल्लाचे साथीदार राजेश झिठूलाल मेश्राम (वय ३२, रा. बहादुरा फाटा) तसेच कपिल ईश्वर मस्करे (वय २३, रा. डिप्टी सिग्नल) अन्य गुंडांसह पोहचले. या गुन्हेगारांनी साक्षीदारास ‘तुम्ही न्यायालयात साक्ष द्यायची नाही, आधी दिलेली साक्ष तुम्ही फिरवून टाका अन्यथा तुम्हाला ठार मारू’, अशी धमकी दिली. आम्ही तुम्हाला कोर्टात भेटणार आहो, असेही आरोपींनी सांगितले. या गुंडांच्या धमकीला न घाबरता साक्षीदारांनी हा प्रकार पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या कानावर घातला. माकणीकर यांनी लगेच लकडगंज पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर, पीएसआय पी.पी. गाडेकर, आर.ए. लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकी देणारे गुंड राजेश मेश्राम आणि कपिल मस्करेच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडे छल्लाने केलेल्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर नमूद असलेली चिठ्ठी आढळली.
कारागृहातून बाहेर येताच गुन्हे
छल्ला चौधरी हा खतरनाक गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. हत्येचे ४ गुन्हे, प्राणघातक हल्ले, लुटमार, घरफोडी, दरोडा असे एकूण ३४ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. कळमन्यातील त्याचा क्राईम रेकॉर्ड लक्षात घेऊन छल्लाला दोन वर्षांकरिता नागपुरातून हद्दपार करण्यात आले होते. त्याचे वर्तन सुधरले नसल्याने त्याला एमपीडीए अंतर्गत कारागृहातही स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, कारागृहातून बाहेर येताच त्याने हत्येचे तीन गुन्हे आणि घरफोडी तसेच दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
न्यायालयातही बनवाबनवी
छल्ला सिरियल किलर म्हणून कुख्यात आहे. त्याने जामीन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर दुसऱ्याच्या नावाखाली भलत्याच व्यक्तीचा फोटो चिपकवून न्यायालयाचीही फसवणूक केली आहे.
छल्लाला पोलिसांनी कारागृहात डांबल्यानंतर छल्लाने आतमध्ये टोळी बनविली. या टोळीतील गुंड जामिनावर बाहेर आले असून, त्यांच्याकडून छल्ला कारागृहात बसूनच गुन्हे करून घेत आहे. आरोपी मेश्राम आणि मस्करेच्या अटकेतून हे स्पष्ट झाले आहे. छल्लाला त्याच्या गुन्ह्यातून सोडविण्यासाठी साक्षीदारांना फितूर करण्याचे प्रयत्न छल्लाचे गुंड करीत आहेत. त्यांनी अशाच प्रकारे अनेकांना धमकावले असावे, असा संशय असून दहशतीमुळे कुणी पुढे आले नसावे, असाही अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मेश्राम आणि मस्करेच्या चौकशीतून आणखी काय पुढे येते त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Serial killer operate gang from jail: Threatens witnesses through aides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.