नागपुरात पोलीस आयुक्तांकडून बुकीबाजाराची गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:29 AM2020-10-13T11:29:14+5:302020-10-13T11:31:14+5:30
bookie Nagpur News पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निदेर्शानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८ ते १० बड्या बुकींना पकडून आणण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक बड्या बुकींना पकडून आणल्यानंतर त्यांची मध्यरात्रीपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतल्याचे वृत्त पसरल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी नागपुरात येऊन बुकींना पकडल्यामुळे शहरातील बुकींबाबत पोलीस हात बांधून बसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते. तथापि, मध्यरात्रीपर्यंत या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.
अमरावती पोलिसांनी खोलापुरी गेट भागात कारवाई करून यवतमाळ तसेच नागपुरातील बुकींना जेरबंद केले. या बुकींना नागपुरातून संचलित केले जात असल्याचे कळताच अमरावतीचे पोलीस नागपुरात पोहचले आणि त्यांनी जरीपटक्यातील सुमित शंकर नागवाणी (रा. पिरामिड सिटी, फ्लॅट क्रमांक २०४, जरीपटका) आणि रॉकी रमेशलाल अलवाणी (रा. जरीपटका) या दोघांना अटक करून अमरावतीत नेले. अमरावती पोलिसांनी नागपुरात येऊन कारवाई केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या निदेर्शानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८ ते १० बड्या बुकींना पकडून आणण्यात आले. येथे त्यांची झाडाझडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वरिष्ठांचा नो रिस्पॉन्स !
या संबंधाने अतिरिक्त आयुक्त रेड्डी यांच्याकडे वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुकींची नावे अथवा संबंधित सविस्तर माहिती मिळू शकली नाही. संबंधित वृत्तालाही दुजोरा मिळू शकला नाही.