नागपुरात नोकराची मालकासोबत बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:51 AM2019-11-13T00:51:04+5:302019-11-13T00:52:55+5:30
ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले. सौरभ मुन्नालाल शर्मा (वय २६, रा. सलम अपार्टमेंट, हजारी पहाड) असे आरोपीचे नाव आहे.
सुमितनगर जयताळा येथील वंदिश चंद्रकांत पंडित यांचे शंकरनगरात व्ही. व्ही. कार नावने दुकान आहे. तेथे सौरभ शर्मा काम करीत होता. १ जानेवारी २०१७ ला पंडित बाहेरगावी गेल्याची संधी साधून सौरभने त्यांची ३ लाख, ८० हजारांची कार नेली. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील इकबाल जे. सहानी यांची साडेचार लाखांची शेवरलेट कार आणि अंधेरी मुंबई येथील क्षितिजकुमार गुप्ता यांची स्कोडा कार( किंमत साडेतीन लाख) ग्राहकांना दाखवून आणतो म्हणून नेली. या कारची रक्कम त्याने परस्पर हडपल्याचा आरोप आहे. त्यानंतर एक मारुती कार त्याने प्रदीप जामगडे यांना विकली. या कारच्या मालकाला १ लाख ६० हजारांचा धनादेश तर तेवढीच रक्कम रोख स्वरूपात जामगडे यांनी सौरभ शर्माच्या माध्यमातून दिली. मात्र, कारमालकाला रक्कम मिळालीच नाही त्यामुळे त्यांच्याकडून फायनन्स कंपनीने मारूती कार जप्त केली. आरोपीच्या या धोकेबाजीची तक्रार पंडित यांनी बजाजनगर पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सौरभ शर्माची चौकशी केली जात आहे.