ज्याच्यावर दाखवला विश्वास त्यानेच केला घात; १५ लाखांची रोकड घेऊन नोकर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 04:45 PM2022-06-08T16:45:20+5:302022-06-08T16:53:58+5:30
सागर यांना संशय आला व त्यांनी तिजोरी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना धक्का बसला.
नागपूर : मालकाने विश्वास ठेवून दुकानातील नोकराजवळ तिजोरीची चाबी दिली आणि नोकरानेच विश्वासघात केल्याचा प्रकार इतवारीत घडला आहे. दुकानातील तिजोरीतील १५ लाखांची रक्कम लंपास केली व मोबाईल बंद करून नोकर पळून गेला. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली व आरोपीला अटक केली. गोविंद रघुवीर मानकर (२२, गुलशननगर) असे नोकराचे नाव आहे.
सागर विजय कृष्णानी (२६, छापरूनगर) यांचे इतवारी अनाज बाजार येथे एस.के.ट्रेडर्स व क्रिष्णा पूजा ट्रेडर्स ही दुकाने आहेत. ६ जून रोजी त्यांनी दुकानातील नोकर असलेल्या गोविंदला दुपारी साडेचारच्या सुमारास १५ लाख रुपयांची रोकड दिली व ती तिजोरीत ठेवायला सांगितली. तिजोरीची चाबी गोविंदकडेच दिली व ते जेवायला निघून गेले. सायंकाळी सात वाजता दुकानात परत आल्यावर तेथे गोविंद नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला फोन लावला. मात्र त्याचा फोन बंद होता.
सागर यांना संशय आला व त्यांनी तिजोरी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण त्यात पैसेच नव्हते. सागर यांनी तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. या घटनेमुळे अनाज बाजारात खळबळ उडाली. पोलिसांनी सखोल तपास केला व आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात आणखी कुणी सहभागी होत का याचा तपास सुरू आहे.