सराफा दुकानात नोकरांनीच मारला हात : पाऊण किलो सोन्याची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 07:57 PM2019-02-02T19:57:19+5:302019-02-02T20:02:37+5:30
सदरमधील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात कार्यरत असलेल्या विश्वासपात्र नोकरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यातून ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. तब्बल चार महिन्यानंतर या बनवाबनवीचा उलगडा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदरमधील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात कार्यरत असलेल्या विश्वासपात्र नोकरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यातून ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. तब्बल चार महिन्यानंतर या बनवाबनवीचा उलगडा झाला. त्यानंतर सराफा व्यापारी कपिल पुरुषोत्तम रुपानी (वय ३८, रा. राजनगर) यांनी सदर पोलिसांकडे दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली. स्नेहा ढोके (वहाणे), निकिता मानोरे आणि दिनेश भाटिया अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रुपानी यांच्या तक्रारीनुसार, सदोदय प्राईड छावणी चौक येथे त्यांचे महेश्वरी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. या दुकानात आरोपी स्नेहा ढोके, निकिता मानोरे आणि दिनेश भाटिया अनेक महिन्यांपासून कार्यरत होते. त्यांच्यावर रुपानी यांचा मोठा विश्वास होता. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना ठेवण्या-आणण्यासाठी ते या तिघांना जबाबदारी देत होते. त्याचा गैरफायदा उचलून या तिघांनी १ ऑक्टोबर २०१८ ते २५ जानेवारी २०१९ दरम्यान ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. या दागिन्यांची किंमत २६ लाख ५६ हजार रुपये आहे. दागिने लंपास केल्याची बाब लक्षात येताच रुपानी यांनी उपरोक्त तिघांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. त्यांना संधी देऊनही ते गुन्हा कबूल करायला तयार नसल्याने अखेर रुपानी यांनी सदर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.