राष्ट्र व संस्कृत भाषेची सेवा करा : जगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:20 AM2018-10-21T00:20:00+5:302018-10-21T00:22:56+5:30
भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर हेदेखील उपस्थित होते. मानवाचे जीवन हे यज्ञासारखे आहे. दीक्षेचा अर्थ स्वत:चा विचार न करता राष्ट्राला जीवन अर्पण करणे हा होता. वाईट गोष्टींपासून दूर राहणे हेच दीक्षाव्रताचे आचरण आहे. देश, आई-वडील, गुरू, अतिथी यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने निर्वाहन करणे हाच दीक्षेचा उपदेश आहे, असे रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी प्रास्ताविक केले.
मधुरा,श्रीवरदाला सर्वाधिक पदके
दीक्षांत समारंभात योग, योगविज्ञान, वास्तू, जर्मन, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, शिक्षण, संगणक उपायोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला व ललित कला यासारख्या ३५ विषयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ६२ पदके व २८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर २३ संशोधकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. एम.ए.संस्कृत विषयात अव्वल राहिलेली मधुरा यशवंत कायंदे व श्रीवरदा श्रीपाद मालगे यांना प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
गुणवंतांना बसला अव्यवस्थेचा फटका
दीक्षांत समारंभादरम्यान अव्यवस्थेमुळे गुणवंतांना नाहक मनस्ताप झाला. कार्यक्रम लवकर आवरता घेण्याच्या प्रयत्नात सात गुणवंतांना मंचावर बोलविण्याचाच प्रशासनाला विसर पडला. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे याची तक्रार केली. यानंतर विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर पदवी प्रदान करण्यात येत असताना इतर विद्यार्थीदेखील छायाचित्र काढण्यासाठी मंचावर चढले. अव्यवस्था दूर करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतला नाही.