‘सर्व्हर’चा झटका अभ्यासाला फटका
By admin | Published: May 17, 2016 02:09 AM2016-05-17T02:09:05+5:302016-05-17T02:09:05+5:30
अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित
नागपूर विद्यापीठ : पेपरच्या एक दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव
नागपूर : अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐन उन्हात धावाधाव करावी लागत आहे. विद्यापीठाचे ‘सर्व्हर’ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ होण्यास वेळ झाला. त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयाच्या चकरा मारताना दिसून आले.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा पाचवा आणि महत्त्वाचा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. यात अभियांत्रिकीसह बीएसस्सी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमए, एमएसस्सी, बीएसस्सी द्वितीय, चतुर्थ आणि नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. या टप्प्यात सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ असल्याने प्रवेशपत्रदेखील ‘डाऊनलोड’ करावे लागतात. महाविद्यालयांकडून ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. परंतु दोन दिवस अगोदरपर्यंत अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्रच दिसत नव्हते. विद्यार्थी सातत्याने महाविद्यालयांमध्ये फेऱ्या मारतच होते.
अखेर दोन दिवस अगोदर महाविद्यालयांकडे परीक्षा प्रवेशपत्रे पोहोचली. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी लगेच प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर त्याचा परिणाम झाला व ओळखपत्रे फारच संथ गतीने ‘डाऊनलोड’ व्हायला लागली. त्यामुळे अखेरच्या दिवशीदेखील शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.(प्रतिनिधी)
‘आॅनलाईन’चा
काय उपयोग?
४आम्ही वेळेवर परीक्षा अर्ज भरले, शुल्कदेखील दिले. अशा स्थितीत आम्हाला वेळेअगोदर परीक्षा प्रवेशपत्रे मिळणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही झाले नाही आणि उलट आम्हाला अभ्यास सोडून महाविद्यालयांत फिरावे लागत आहे. असल्या ‘आॅनलाईन’ प्रणालीचा काय उपयोग अशी संतप्त भावना काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
तांत्रिक अडचणीमुळे झाला गोंधळ
४यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी सर्व महाविद्यालयांनी परीक्षा प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशपत्रे ही ‘पीडीएफ’मध्ये असतात. त्यामुळे सहाजिकच ‘सर्व्हर’वर ताण आला. परंतु अखेरच्या दिवशी सर्वांनाच प्रवेशपत्रे मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तांत्रिक कारणांमुळे तयार झाली नव्हती. त्यांनादेखील दिलासा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.