मुलांकडे दुर्लक्ष होत असूनही बाधितांची सेवा ! ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:52+5:302021-05-09T04:07:52+5:30
वर्षभरापासून पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा : अत्यावश्यक सेवा असल्याने सुटी नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च २०२० ...
वर्षभरापासून पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा : अत्यावश्यक सेवा असल्याने सुटी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च २०२० पासून कोरोना संकट आहे. अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. सेवा बजावताना बाधित होऊन अनेकांचा मृत्यू झाला. अशा घटनांनी आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना बाधा तर होणार नाही, अशा धास्तीत कोविड रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाल्यापासून परिचारिका अनिता फुलझेले या वॉर्डात सेवा देत आहेत.
वर्षभरापासून कोरोना योद्धा म्हणून अनिता फुलझेले कार्यरत आहेत. सुरुवातीला कोरोना सर्व्हेच्या कामात होत्या. त्यानंतर त्यांनी राजनगर येथील क्वारंटाईन सेंटरवर काम केले. यामुळे त्यांना राजभवन येथे दोन महिने वास्तव्य करावे लागले. फुलझेले यांचे चार जणांचे कुटुंब आहे. पती व दोन मुले असून, मोठा मुलगा दहावीत तर लहान तिसऱ्या वर्गात आहे. परंतु त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनामुळे घरकाम करणाऱ्या महिलाही मिळत नसल्याने, या कालावधीत अनिता फुलझेले यांना अडचणींचा सामना करून कर्तव्य बजावावे लागत आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे पाच वॉर्ड आहेत. मागील दोन महिन्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असल्याने स्वत:सोबतच कुटुंबातील सदस्यांना संक्रमण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. ड्युटीवरून घरी परल्यानंतर आधी गरम पाण्यात कपडे निर्जंतूक करावे लागते. अंघोळ केल्यानंतरच मुलांच्या संपर्कात येते. स्वयंपाक व घरची कामे करावे लागतात. त्याशिवाय पर्याय नसल्याचे अनिता फुलझेले यांनी सांगितले. कोरोना वॉर्डात ड्युटी असल्याने खबरदारी घ्यावी लागते. परंतु बाधितांची सेवा हीच ईश्वर सेवा याची संधी मिळाली, याचा आनंदही असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कोरोना योद्धामुळेच आज कोरोनाबाधितांवर उपचार शक्य झाले आहे.