प्रमाणपत्रासाठी प्रत्येक वस्त्यांमध्ये सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:30 PM2020-12-30T23:30:15+5:302020-12-30T23:34:06+5:30
Service centers, nagpur news उत्पन्नाचा दाखला असो की जातीचे प्रमाणपत्र आता आपल्याला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. आधार कार्डपासून तर प्रत्येक प्रमाणपत्र आपल्याला आपल्या वस्तीत व गावातच तयार करून मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्पन्नाचा दाखला असो की जातीचे प्रमाणपत्र आता आपल्याला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. आधार कार्डपासून तर प्रत्येक प्रमाणपत्र आपल्याला आपल्या वस्तीत व गावातच तयार करून मिळेल. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. नागपूर जिल्हा व शहरात एकूण ४२८ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वाधिक गर्दी ही विविध प्रमाणपत्र तयार करण्यासाठी होत असते. जिल्हाधिकारी कार्यालय असो की तहसील कार्यालय येथील सेतू कार्यालयात प्रमाणपत्रासाठी रांगाच रांगा लागत असतात. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ही सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी टाळणे हाच सर्वात महत्त्वाचा उपाय ठरला होता. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील गर्दी ही कायमस्वरूपी कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय ठरणार आहे.
ऑनलाईन सातबाराची सुविधा कायम व्हावी
सचिन कुर्वे हे जिल्हाधिकारी असताना जिल्ह्यात ऑनलाईन सातबाराची सुविधा निर्माण करण्यात आली होती. या अभिनव प्रकल्पाने नागपूर जिल्ह्याला राष्ट्रीयस्तरावरचा पुरस्कारही मिळवून दिला होता. परंतु ही सुविधा सध्या व्यवस्थित सुरू नाही. बहुतांश ठिकाणी ती बंद आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू झाले असतानाही ऑनलाईन सातबाराची सुविधाही कायम करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.