शोषितांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा
By admin | Published: November 30, 2014 12:55 AM2014-11-30T00:55:03+5:302014-11-30T00:55:03+5:30
स्वामी विवेकानंद व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची केलेली सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
नितीन गडकरी : अपंगांना साहित्य वाटप
नागपूर : स्वामी विवेकानंद व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची केलेली सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. महापालिकेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत आयोजित ० ते १८ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना साहित्य व साधने वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे , सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, अप्पर आयुक्त हेमंतकुमार पवार, शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, शिवसेनेच्या गटनेत्या शीतल घरत, सभापती गिरीश देशमुख, सविता सांगोळे व अश्विनी जिचकार, सामाजिक कार्यकर्ते अभिजित राऊत आदी उपस्थित होते.
विवेकानंद व उपाध्याय यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून महापालिका व पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट साहित्य वाटप करीत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. देहदानाप्रमाणे दृष्टिदानाची चळवळ उभी राहिली पाहिजे. त्या दृष्टीने माधव नेत्रपेढी चांगले काम करीत आहे. गरीब लोकांना डायलिसिसची सोय कमी खर्चात उपलब्ध केलेली आहे. यासाठी आणखी दोन केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मिलिंद माने यांनी नागपुरातील सहकारी हॉस्पिटलचा अभ्यास करावा. तसेच पूर्व विदर्भातील सिकलसेलचा आजार विचारात घेता त्यावर उपाययोजना कराव्या. यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही गडकरी यांनी माने यांना दिली. अपंगांना कृत्रिम अवयव पुरविण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड याचे त्यांनी अभिनंदन केले. विविध सेवा, सुविधांची माहिती प्रवीण दटके यांनी यावेळी दिली. श्याम वर्धने यांनी गरजू विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी २२४ अपंग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. वेकोलिचे महाप्रबंधक सुरेश राव, पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅन्ड ह्युमन सिसोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार, महाजन फिल्म अॅकेडमीचे संचालक विजयकुमार सूद, डॉ. खापर्डे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, नगरसेवक संजय बोंडे, प्राचार्य योगानंद काळे उपस्थित होते. संचालन दिनेश मासोदकर यांनी तर आभार लोखंडे यांनी मानले.(प्रतिनिधी)