सेवा हाच धर्म आहे : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:25 AM2018-08-26T01:25:09+5:302018-08-26T01:28:25+5:30
समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या नवम दशकपूर्ती सोहळ्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना डॉ. भागवत बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निखील मुंडले, सचिव नागेश कानगे, विश्वास बक्षी, मकरंद पांढरीपांडे, विनय बखने, संदीप धर्माधिकारी, माया ठोंबरे आदी उपस्थित होते. रावसाहेब वाडेगावकर यांनी १९२८ मध्ये दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या माध्यमातून मध्य भारतात पहिली अंधांची शाळा सुरू केली. या शाळेने ९० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, संघ आणि असोसिएशनच्या कामाचा अतिशय जुना संबंध आहे. किंबहुना संघ आणि या कार्याला सारखीच वर्षे झाली आहेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी शाळेसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणाले की, जीवनाला पूर्णत्वाकडे नेण्याचे दोन पैलू आहे. आपण परमेश्वराचे रूप आहोत व जगात सर्वत्र परमेश्वर आहे. ही भावना ठेवून जगात जनार्दन शोधावा. दृष्टी हे साधन नसली तरी दृष्टिबाधित व्यक्तीला दयेची गरज नसते. त्याला मदतीची आवश्यकता असते. लहानपणी आपल्यालाही मदतीची गरज भासतेच. दृष्टी हे साधन असणाºयांनी मदतीचे कार्य आत्मियतेने करावे. तो आपला आहे अशी भावना ठेवून, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जसा सागर हा असंख्य बिंदंूनी बनतो, तसा समाजातसुद्धा वेगवेगळे घटक असतात. दृष्टिबाधितसुद्धा त्यातीलच एक घटक आहे. त्यालासुद्धा समान न्याय मिळावा, असा प्रयत्न समाजातून व्हायला हवा. प्रकृतीने त्याच्यात बाधा निर्माण केली असली तरी, आपल्यामुळे तो बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक संवेदनेची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या परिघात काम केले पाहिजे. तेव्हाच सेवेचे कर्मयज्ञ नवम दशकपूर्ती करू शकतात. या कार्यक्रमाचे संचालन कांचन नाजपांडे यांनी केले. प्रास्ताविक नागेश कानगे व आभार निखील मुंडले यांनी मानले.