विदर्भातील १३,७३३ कोविड रुग्णांना दिली सेवा; १५१ रुग्णवाहिका रुग्णसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:05 AM2020-05-24T10:05:51+5:302020-05-24T10:06:11+5:30
'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिकेची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. विशेषत: 'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबतच या रुग्णवाहिकेतील डॉक्टर, चालक व व्यवस्थापकही ‘वॉरिअर्स’ ठरले आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि 'बीव्हीजी इंडिया लिमिटेड' या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया ‘१०८ रुग्णवाहिका’ची संख्या राज्यात ९३७ आहे. यात २३३ ‘अॅडव्हान्सड् लाईफ सपोर्ट (एएलएस) तर ४०७ ‘बेसिक लाईफ सपेट अॅम्ब्युलन्स (बीएलएस) आहे. या सेवेच्या कार्यात ५००० हजारावर डॉक्टर्स, चालक व व्यवस्थापक काम करीत आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी या सेवेचे लोकार्पण झाले. तेव्हापासून ते ३० एप्रिल २०२० पर्यंत ४८ लाख ३८ हजार १०२ रुग्णांना सेवा दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर १०८ रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात सेवा घेतली जात आहे. सुरूवातीला एकूण रुग्णवाहिकेच्या २५ टक्के रुग्णवाहिका यात समाविष्ट करण्याचा सूचना होत्या, परंतु नंतर रुग्णसंख्या वाढताच ७५ टक्क््यांपर्यंत रुग्णवाहिकेत वाढ करण्यात आली. सध्या विदर्भात १५१ रुग्णवाहिका कोविड रुग्णसेवेत आहेत. -नागपूर सर्कलमध्ये ६८३८ रुग्णांना दिली सेवानागपूर सर्कलमध्ये येणाऱ्या नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा या सहा जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या सेवेत ६९ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ११ मार्च ते २१ मे या दरम्यान १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने ६ हजार ८३८ रुग्णांसह, संशयित रुग्ण, संपर्कात आलेले लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास व आणण्यासही मदत करण्यात आली. नागपुरात २४००, भंडाºयात ९२९, चंद्रपूर १८१३, गडचिरोली ४६३, गोंदिया ७७० व वर्धेत ४६३ रुग्णांना मदत करण्यात आली.
अकोला सर्कलमध्ये ६८९५ रुग्णांना मदत अकोला सर्कलमध्ये येणाऱ्या अकोल्यासह अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यासाठी ८२ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या मदतीने ६ हजार ८९५ रुग्ण व संशयितांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्याची व बरे झालेल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंतची सेवा देण्यात आली. अकोल्यात आतापर्यंत १,४९६, अमरावती २,१२८, बुलढाणा १,०१७, वाशिम ३३८ तर यवतमाळ येथे १,९१६ रुग्णांना मदत करण्यात आली.
चालक व डॉक्टर प्रशिक्षण प्राप्त
कोविड रुग्णांच्या सेवेत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील चालक व डॉक्टरांना हे रुग्ण हाताळण्यासोबत पीपीई किट घालण्याचे व काढण्याचे प्रशिक्षण प्राप्त आहे. त्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात कार्यात सेवा देत असलेले सर्व चालक, डॉक्टर्स यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक डॉ. बालाजी मंगम व विभागीय व्यवस्थापक डॉ. प्रशांत घाटे हे कोविड वॉरिअर्स ठरले आहेत.