हा माणुसकीचा सेवाभाव!
By admin | Published: October 23, 2016 02:51 AM2016-10-23T02:51:42+5:302016-10-23T02:51:42+5:30
एखादा दिव्यांग जेव्हा शिबिरातून ‘जयपूर फूट’ घालून स्वत:च्या पायाने चालत जातो, तेव्हा मन प्रसन्न होते.
नारायण व्यास : १५ लाख रुग्णांना साहित्य वाटप
नागपूर : एखादा दिव्यांग जेव्हा शिबिरातून ‘जयपूर फूट’ घालून स्वत:च्या पायाने चालत जातो, तेव्हा मन प्रसन्न होते. कामाचे समाधान मिळते. तो दिव्यांग आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असल्याचा मनात भाव निर्माण होतो आणि माणुसकीच्या सेवाभावाचा पाझर फुटतो, अशा भावना भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे नारायण व्यास यांनी व्यक्त केल्या.
जयपूर येथील या भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद व नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने मागील १४ आॅक्टोबरपासून यशवंत स्टेडियम येथे दिव्यांगांना ‘जयपूर फूट’ आणि साहित्य वाटप शिबिर सुरू आहे. व्यास या संपूर्ण शिबिराची धुरा सांभाळत असून, यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या या समितीने मागील ४१ वर्षांत तब्बल १५ लाख ३४ हजार ७८४ दिव्यांगांना आपल्या पायावर उभे केले आहे. सध्या या समितीच्या देशभरात एकूण २७ शाखा कार्यरत असून, त्या प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांना नि:शुल्क ‘जयपूर फूट’सह इतर आवश्यक साहित्य दिल्या जाते. एवढेच नव्हे, तर त्याला स्वत:च्या पायावर उभे केल्यानंतर स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगाराची साधने सुद्धा भेट दिली जातात. समितीच्यावतीने आतापर्यंत वेगवेगळ्या २७ देशांत शिबिरे घेतली आहेत. ‘जयपूर’ येथे समितीचे रिसर्च सेंटर असून, येथे नवनवीन संशोधन केल्या जाते. या संस्थेची स्थापना ही जयपूर येथे झाल्याने कृत्रिम पायाला ‘जयपूर फूट’ असे नाव मिळाले. विशेष म्हणजे, ‘जयपूर फूट’ हा पूर्णत: ‘मेड इन इंडिया’ असून, तो जगभरात प्रसिद्ध आहे. समितीचे संस्थापक डी. आर. मेहता व अनिवासी भारतीय प्रेम भंडारी यांच्या विशेष प्रयत्नाने नागपुरातील शिबिर यशस्वी होत आहे. या शिबिरासाठी एचएसबीसी बँकेने विशेष निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही यावेळी व्यास यांनी आवर्जून सांगितले.(प्रतिनिधी)