गुजरातमधून तिळाची आवक वाढली :यंदा तीळ आणि गुळाचे दर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:19 AM2021-01-08T00:19:28+5:302021-01-08T00:21:28+5:30
Sesame imports from Gujarat increase राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून नागपुरात तिळाची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात पांढरे तीळ १२० ते १३० रुपये आणि लाल तीळ १५० ते १६० रुपये भाव आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून नागपुरात तिळाची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात पांढरे तीळ १२० ते १३० रुपये आणि लाल तीळ १५० ते १६० रुपये भाव आहेत. संक्रांतीच्या चार ते पाच दिवसांपूर्वी बाजारात गर्दी राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मकर संक्रांतीला सात दिवस उरले असून बाजारात पांढऱ्या आणि लाल तिळाची मागणी वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी आहेत. गेल्यावर्षी पांढऱ्या तिळाचे भाव १४५ ते १८० रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे भाववाढ होऊ नये म्हणून महिला आतापासून खरेदी करत आहेत. दहा दिवसांपूर्वी नवीन तिळाची आवक फारच कमी असल्याने व्यापाऱ्यांनी जुन्या तिळाची विक्री सुरू केली होती. त्यामुळे १० ते २० रुपये किलो भाव वाढले होते. नवीन तिळाची आवक सुरू होताच भाव कमी झाल्याची माहिती इतवारीतील नीरव ट्रेडिंगचे संचालक अरविंद पटेल यांनी दिली.
पटेल म्हणाले, पांढऱ्या तिळाची विक्री संपूर्ण देशात होते. त्या तुलनेत लाल तिळाची विक्री केवळ महाराष्ट्रात मुख्यत्वे नागपुरात होते. त्यामुळे नागपुरात लाल तिळाचे दर पांढऱ्याच्या तुलनेत जास्त असतात. गेल्यावर्षी संक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी लाल तीळ १९० रुपयांवर पोहोचले होते. भारतात पांढऱ्या तिळाचे उत्पादन राजस्थान (उंझा), मध्य प्रदेश (ग्वालिअर) आणि लाल तीळ गुजरातमध्ये (राजकोट) जास्त प्रमाणात होते. देशांतर्गत तिळाची गरज ४.५ लाख मेट्रिक टन इतकी आहे. त्या तुलनेत उत्पादन कमी आहे.
मागणी वाढल्यास भाववाढ
गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले गुळाचे (लड्डू) भाव कमी झाले असून किरकोळमध्ये ४० रुपये किलो आहेत. कोल्हापुरी गूळ (केमिकलयुक्त) ५५ ते ६० रुपये आणि देशी गूळ (केमिकलरहित) ७५ रुपये किलो आहेत. यावर्षी गुळाचे शाॅर्टेज आहे. दरवर्षी या काळात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातून होणारी गुळाची आवक कमी आहे. संक्रांतीमागणी वाढल्यानंतर भाव वाढू शकतात.
- चंदू जैन, व्यापारी