यो यो हनी सिंग हाजीर हो! कोर्टाचा आदेश; 'हे' आहे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:46 PM2022-02-02T17:46:47+5:302022-02-02T18:26:45+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंगला आवाजाचे नमूने देण्याकरिता पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे.
नागपूर : अश्लील गाणी गाऊन ती यूट्यूबवर अपलोड केल्याचा आरोप असलेला लोकप्रिय रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याला आवाजाचे नमूने देण्याकरिता पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार हनी सिंगला ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनी सिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनी सिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे तो कारागृहाबाहेर आहे.
गेल्या जानेवारीमध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणामध्ये पाचपावली पोलिसांना हनी सिंगच्या आवाजाचे नमूने रेकॉर्ड करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार, पोलिसांनी १० जानेवारी २०२२ रोजी हनी सिंगला पत्र पाठवून २५ जानेवारी २०२२ रोजी पोलीस ठाण्यात बोलावले होते. हनी सिंगने त्या पत्राला उत्तर देऊन विविध कारणांमुळे पोलीस ठाण्यात येण्यास असमर्थ असल्याचे कळविले. पोलिसांनी ही बाब अन्य एका संबंधित प्रकरणात सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन हनी सिंग तपासाकरिता सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे सत्र न्यायालयाने हनी सिंगला पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एफआयआर
जब्बल यांनी हनी सिंगविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा, याकरिता सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी कनिष्ठ फौजदारी न्यायालयात अर्ज दाखल केले. ते अर्ज खारीज झाले. परिणामी, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून हनी सिंगविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. त्यानुसार, संबंधित एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
हनी सिंगला दुबईत जाण्याची परवानगी
अटकपूर्व जामिनाच्या अटीनुसार, हनी सिंगला विदेशात जाण्यापूर्वी सत्र न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परिणामी, त्याने कार्यक्रम सादरीकरणाकरिता २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान दुबईला जाण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यामध्ये हनी सिंगला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला, तसेच त्याला दुबईत जाण्याची परवानगीही दिली. अर्जावर न्या. एस.ए.एस.एम. अली यांच्यासमक्ष सुनावणी झाली.