सत्र संपले पण येथील शाळांमध्ये विज्ञान, गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 09:06 PM2020-02-28T21:06:01+5:302020-02-28T21:07:46+5:30
जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची चिंता पालकांनाही आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची चिंता पालकांनाही आहे.
जिल्हा परिषदेद्वारे संचालित माध्यमिक विभागाच्या १६ शाळा आहेत. येथे वर्ग ५ ते १० पर्यंत शिक्षण देण्यात येते. या १६ शाळांमध्ये १५०० च्या जवळपास विद्यार्थ्यांची संख्या आहे. २०० च्या जवळपास दहावीचे विद्यार्थी आहेत. पण या १६ शाळांमध्ये काही शाळेत शिक्षक अतिरिक्त आहेत. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलजवळीची शाळा दहाव्या वर्गापर्यंत आहे. १५४ पटसंख्या असलेल्या या शाळेत ९ शिक्षक मंजूर आहेत. या शाळेत दहावीचे ३० विद्यार्थी आहेत. पण या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर गणित आणि विज्ञान शिकविणारे शिक्षकच मिळाले नाहीत. नांद येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतही दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचा शिक्षक मिळालेला नाही. विज्ञान आणि गणितासारखे महत्वाच्या विषयाला शिक्षक मिळत नसतील तर शाळेचे निकाल काय लागतील हा प्रश्नच आहे. शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये १६ विद्यार्थी आहे आणि शिक्षकांची संख्या ८ आहे. येथे शिक्षक अतिरिक्त असतानाही त्यांचे सत्र संपेपर्यंत समायोजन का झाले नाही, हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती खुद्द जि.प.चे उपाध्यक्ष यांनी अनुभवली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर याचे खापर फोडले.
प्रशासनाचे दुर्लक्ष का?
बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा असते. अशा महत्वाच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांना शासनाच्या शाळेतच शिक्षक मिळत नसेल तर शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारात ठेवण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचे भावना स्थानिक रहिवासी बाळू इंगोले यांनी व्यक्त केली आहे.