सत्र प्रणालीचा उपक्रमांना फटका?
By admin | Published: September 23, 2016 03:09 AM2016-09-23T03:09:51+5:302016-09-23T03:09:51+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून विज्ञानसोबतच कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे
नागपूर विद्यापीठ : एनएसएस, एनसीसीमध्ये यंदा अपेक्षित सहभाग नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून विज्ञानसोबतच कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा द्यायच्या आहेत. याचा फटका विद्यापीठाच्या सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना बसण्याची शक्यता आहे. अभ्यासाचा तणाव असल्यामुळे ‘एनएसएस‘, ‘एनसीसी’ तसेच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी व्हायचे की नाही असा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहे.
मागील वर्षीपर्यंत पदवीस्तरावर बीएस्सीला सत्र प्रणाली होती. परंतु यंदापासून कला व वाणिज्य अभ्यासक्रमांनादेखील ही प्रणाली अनिवार्य आहे. नोव्हेंबरपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. याच कालावधीत ‘एनएसएस’, ‘एनसीसी’, क्रीडा स्पर्धा ‘अश्वमेध’, सांस्कृतिक स्पर्धा ‘इंद्रधनुष्य’, तांत्रिक महोत्सव ‘अविष्कार’ तसेच आपत्कालीन व्यवस्थापनावर आधारित ‘आव्हान’चे आयोजन करण्यात येते. हे सर्व उपक्रम साधारणत: आॅक्टोबरपासून सुरू होतात व जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत चालतात.
या उपक्रमांत सहभाग घेतला तर अभ्यासाला फटका बसू शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, विधी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हव्या त्या प्रमाणात या उपक्रमांत सहभागी होत नसल्याचे चित्र याअगोदर दिसून आले आहे.
यंदापासून कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थीदेखील असेच पाऊल उचलतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)
परीक्षा लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन
सत्र प्रणालीमुळे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्याची संख्या कमी होऊ शकते हे अधिकाऱ्यांना माहीत आहे. नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीच विविध उपक्रमांत लक्षणीय कामगिरी केली आहे. परीक्षेमुळे त्यांचा हिरमोड होऊ नये यासाठी परीक्षा तारखा लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘एनएसएस’चे कार्यक्रम समन्वयक डॉ.भाऊ दायदार व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.निहाल शेख यांनी सांगितले.