सत्र न्यायालय : युवा सेनेच्या विक्रम राठोडला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:02 AM2020-07-08T00:02:19+5:302020-07-08T00:04:35+5:30
शिवसेनाप्रणित युवा सेनेचा अध्यक्ष विक्रम ऊर्फ विक्की सुरेश राठोड याला मंगळवारी दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याला खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनाप्रणित युवा सेनेचा अध्यक्ष विक्रम ऊर्फ विक्की सुरेश राठोड याला मंगळवारी दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याला खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला. न्या. विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.
राठोडवर १५ लाख रुपयाची खंडणी मागण्याचा व ५ लाख रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारण्याचा आरोप आहे. या प्रकरणात अजनी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. शिवसेनेचा दक्षिण नागपूर विभाग प्रमुख संजोग सुरेश राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. तो विक्रमचा भाऊ होय. पोलीस हरकतीत आल्यानंतर विक्रम पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मेहबूब बादशाह शेख असे फिर्यादीचे नाव असून ते पारडी येथील रहिवासी व परवानाधारक सावकार आहे. आरोपी मानेवाडा येथे राहतो. आरोपींनी शेख यांना व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्याकरिता खंडणी मागितली होती. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी विक्रमला अटक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने यासह विविध मुद्दे विचारात घेता विक्रमला दणका दिला.