शिवसेनेच्या खासदाराला धक्का; काँग्रेस आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, तिकीटही मिळणार!
By कमलेश वानखेडे | Published: March 24, 2024 07:09 PM2024-03-24T19:09:26+5:302024-03-24T19:09:58+5:30
कृपाल तुमानेंचा पत्ता कट? काँग्रेसला धक्का देत आ. राजू पारवेंनी उचलला शिवसेनेचा धनुष्यबाण.
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरविताना ‘पॉलिटिकल ड्रामा’ घडला. दोन टर्मपासूनचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांचा यावेळी मात्र पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयात करून त्यांच्या हाती ‘धनुष्यबाण’ सोपवण्यात आला. आ. पारवे यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आ. पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे व आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविला आहे. आता रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे विरुद्ध शिवसेनेकडून राजू पारवे यांच्यात सामना होईल, हे स्पष्ट झाले आहे.
खासदार तुमाने हे शिवसेनेकडून सलग तीन टर्मपासून लढत असून दोनदा विजयी झाले आहेत. मात्र, यावेळी भाजपने ही जागा स्वत:कडे खेचण्यासाठी पूर्ण जोर लावला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणारे खा. कृपाल तुमाने यांना यावेळी चौथ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळणार की, ही जागा खेचण्यात भाजपला यश येणार याची जिल्ह्यात चर्चा ‘हॉट’ होती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे उमरेडचे आ. राजू पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठेतील निवासस्थानी भेट घेतल्यामुळे ‘ट्विस्ट’ आणखीनच वाढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रामटेकची जागा सोडण्यास तयार नव्हते. रामटेकशी पक्षाची अस्मिता जुळली आहे. शिवाय ही जागा सोडली तर अख्ख्या नागपूर जिल्ह्यातून धनुष्यबाण गायब होतो. कारण खाली पक्षाचा एकही आमदार नाही. शिवाय तुमाने हे शिंदे गटाचे पूर्व विदर्भातील एकमेव खासदार आहेत. त्यामुळे शिंदे रामटेकसाठी अडून होते.
अशात खा. तुमाने यांचा ‘ग्राफ’ घसरला असल्याचे कारण देत तुमाने यांना बदलण्याचा विनंती केली. भाजपने ‘धनुष्यबाण तुमचा, पण उमेदवार आमचा’, असा प्रस्ताव देत काँग्रेसचे आ. राजू पारवे यांना उमेदवारी देण्याचा सुधारित प्रस्ताव दिला. शेवटी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटनितीपुढे शिंदे नमले व आ. राजू पारवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
उमरेडमध्ये मतविभाजन टाळण्याची खेळी
-आ. राजू पारवे यांनी २०१४ मध्ये उमरेड मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना यश आले नव्हते. २०१९ मध्ये त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यांनी ९१ हजार ९६८ मते घेत भाजपचे माजी आ. सुधीर पारवे यांना १८ हजार २९ मतांनी पराभूत करीत विजय नोंदविला होता. उमरेडमध्ये दोन पारवेंचाच सामना होता. आ. राजू पारवे यांना सोबत घेत भाजपने उमरेड मतदारसंघात दोन पारवेंमध्ये होणारे मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमानेंच्या तीन निवडणुकांचा लेखाजोखा
- २००९ मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचा १६ हजार ७०१ मतांनी पराभव केला होता.
-२०१४ मध्ये कृपाल तुमाने यांना ५ लाख १९ हजार ८९२ मते मिळाली होती. त्यांनी मुकुल वासनिक यांना १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभूत केले.
-२०१९ मध्ये तुमाने यांना ५ लाख ९७ हजार १२६ मते मिळाली होती. मात्र, त्यांचे मताधिक्य काहीसे घटले. त्यांनी १ लाख २६ हजार ७८३ मतांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांना मात दिली.