कुहीत सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:05+5:302021-05-05T04:12:05+5:30
कुही : शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रशासनातर्फे कुही तालुक्यासाठी कोविड केअर सेंटर गतवर्षी उभारण्यात आले होते. परंतु, येथे रुग्णांकरिता केवळ ...
कुही : शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रशासनातर्फे कुही तालुक्यासाठी कोविड केअर सेंटर गतवर्षी उभारण्यात आले होते. परंतु, येथे रुग्णांकरिता केवळ तात्पुरती ऑक्सिजन व प्राथमिक उपचारांचीच व्यवस्था आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती थोडीशी जरी बिघडली अथवा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील रुग्णाला नागपूर येथे रेफर केले जाते. मात्र, नागपुरातील शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कुहीत सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी मातोश्री प्रभादेवी सेवा संस्थेचे संचालक प्रमोद घरडे यांनी केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. बहुतेक कोविड संक्रमित रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, या संदर्भात तालुक्यात अद्ययावत अशी कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णांनी उपचार कुठे घ्यावेत, असा प्रश्न घरडे यांनी उपस्थित केला आहे. घरडे यांनी कोविड सेंटरसाठी १० जम्बो सिलिंडर देऊन ऑक्सिजनची सोय करून दिली आहे. मात्र, कोविड सेंटर येथे रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.