क्रिकेट सट्टा अड्ड्यासाठी सेटिंग

By Admin | Published: August 24, 2015 02:29 AM2015-08-24T02:29:44+5:302015-08-24T02:29:44+5:30

कारवाईनंतर क्रिकेट सट्टा चालविण्याची परवानगी देतो, असे सांगून एका बुकीकडून अडीच लाख उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर ....

Setting for Cricket Betting Base | क्रिकेट सट्टा अड्ड्यासाठी सेटिंग

क्रिकेट सट्टा अड्ड्यासाठी सेटिंग

googlenewsNext

जरीपटक्यातील दोन पोलिसांना अटक : एसीबीची कारवाई
नागपूर : कारवाईनंतर क्रिकेट सट्टा चालविण्याची परवानगी देतो, असे सांगून एका बुकीकडून अडीच लाख उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हे दाखल केले. राजकुमार राधेश्याम पाल (वय ३१) आणि पंकज अनिल मिश्रा (वय २८) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जरीपटका ठाण्यात कार्यरत आहेत.
दीपक तलियानी असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्याची मोबाईल शॉपी आहे. अधिकारक्षेत्रात नसताना पाल आणि मिश्राने चार दिवसांपूर्वी प्रतापनगरातील एका पोलिसाला घेऊन सट्टा अड्ड्यावर धाड घातली. कारवाई टाळण्यासाठी या तिघांनी हातोहात एक लाख रुपये उकळले.
त्यानंतर पाल आणि मिश्राने दीपक आणि गोलूला जरीपटक्यात धंदा सुरू करण्यास सांगून त्याच्याकडून पुन्हा दीड लाख रुपये मागितले. प्रतापनगरातून अड्डा हलवून जरीपटक्यात अड्डा सुरू केला नाही तर वेळोवेळी कारवाई करू, अशी धमकीही दिली. त्यानंतर पुढचे दोन दिवस पाल आणि मिश्रा दीपकला फोन करून सारखी दीड लाखांची मागणी करू लागले. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी दीपकने पाल आणि मिश्राला पुन्हा ५० हजार रुपये देण्याचे टाळले. परंतु, त्यांनी एक लाखापेक्षा कमी घेणार नाही, असे सांगत कारवाईचा धाक दाखवला. त्यामुळे दीपकने सरळ एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी कारवाईसाठी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे दीपकने पाल आणि मिश्राला फोन करून रक्कम घेण्यासाठी २० आॅगस्टला खामला चौकात बोलावले. त्यानुसार पाल आणि मिश्रा चौकात पोहचले. मात्र, दीपक सोबत आणखी एक जण पाहून त्यांना संशय आला. त्यांनी लाचेची रक्कम घेतलीच नाही. परंतु, लाचेचा विषयही टाळला. नंतर धरमपेठेत बोलणी झाली.
मात्र, ‘बाद मे मिलेंगे‘ म्हणत हे दोघे तेथून सटकले. दीपकने त्यानंतर सारखे दोन दिवस त्यांना पैसे घेऊन जाण्यासाठी फोन केले. मात्र, संशय आल्यामुळे नंतर या दोघांनी त्यावर भाष्यच करण्याचे टाळले. ते आता रक्कम स्वीकारणार नाही, याची खात्री पटल्यामुळे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी सदर पोलीस ठाण्यात लाच मागण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून राजकुमार पाल आणि पंकज मिश्रा या दोघांविरुद्ध सदर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Setting for Cricket Betting Base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.