मोकळ्या प्लॉटवर देवतांच्या मूर्तींची स्थापना
By admin | Published: July 29, 2014 12:52 AM2014-07-29T00:52:03+5:302014-07-29T00:52:03+5:30
काही लोकांनी मोकळ्या प्लॉटवर देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यामुळे दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन निकाली काढली.
हायकोर्टाचा हस्तक्षेपास नकार : दिवाणी न्यायालयात जाण्याची मुभा
नागपूर : काही लोकांनी मोकळ्या प्लॉटवर देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यामुळे दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन निकाली काढली. याचिकाकर्त्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागून दिलासा मिळविण्याची मुभा देण्यात आली आहे.
विजय निंबाळकर व हुसेन अमीन अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. देवीनगर दुर्गामंदिराला लागून हुसेन यांचा मोकळा प्लॉट आहे. प्लॉटला वॉल कम्पाऊंड आहे. २३ एप्रिल २०१३ रोजी रात्री काही लोकांनी वॉल कम्पाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व प्लॉटच्या मधोमध देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हुसेन यांचे व्यवस्थापक निंबाळकर यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, पण ठोस कारवाई करण्यात आली नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)