लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 08:27 PM2020-04-15T20:27:27+5:302020-04-15T20:29:32+5:30

सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

Setting lockdown limit in the hands of citizens: Collector Thakre | लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

Next
ठळक मुद्दे‘फेसबुक लाईव्ह’ : साधला नागरिकांशी संवाद, प्रश्नांची उत्तरेही दिली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार काय, २० एप्रिलनंतर दुकाने सुरू होतील काय, ग्रामीण भागात असलेल्या एमआयडीसी मधील उद्योग सुरू होतील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लॉकडाऊनची मर्यादा कमी करणे अथवा वाढविणे हे नागरिकांच्या हातात आहे. लॉकडाऊनचे पालन झाले तर कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल.
बाहेरगावी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या शहरात जाता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत:ला आहे त्या ठिकाणीच ठेवणे, हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आहे तेथेच राहा. तेथे काही अडचणी येत असेल तर स्थानिक प्रशासन नक्कीच मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.
नागपूर शहरात ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्या भागातील सुमारे तीन किलोमीटर परिघाचा परिसर सील करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजानजी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, रवि गीते, मेट्रोचे अखिलेश हळवे, आनंद नगरकर, आनंद अंबेकर, बरखा गोयनका आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती
 

२० एप्रिल रोजीच्या परिस्थितीनुसार निर्णय
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आजच नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार १९ एप्रिलपर्यंत परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. परिस्थिती आटोक्यात असली तर काही गोष्टींमध्ये शिथिलता देता येईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा २० एप्रिल रोजी असलेल्या परिस्थितीवर आधारित राहील.

दररोज ६५ ते ७० हजार लोकांना मदत
लॉकडाऊनदरम्यान निराधार ज्येष्ठ नागरिक, गरजू व्यक्ती, दिव्यांगांना त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन समाजसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत भोजन, दैनंदिन आवश्यकतेचे सामान पोहचवीत आहेत. दररोज सुमारे ६५ ते ७० हजार लोकांपर्यंत मदत पोहचविली जात आहे. रस्त्यावर भटकंती करणारे, बेघर लोकांनासुद्धा मनपाने उभारलेल्या बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आले असून, तेथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Setting lockdown limit in the hands of citizens: Collector Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.