पोलिसांशी ‘सेटिंग’ करणारा पोहोचला कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:16+5:302020-11-27T04:04:16+5:30
नागपूर : एका वर्षात गुंतवणूक दुप्पट करण्याचा बनाव करून १०० कोटी रुपयाची ठगबाजी करणाऱ्या विजय गुरुनुले याने पोलिसांशी सेटिंग ...
नागपूर : एका वर्षात गुंतवणूक दुप्पट करण्याचा बनाव करून १०० कोटी रुपयाची ठगबाजी करणाऱ्या विजय गुरुनुले याने पोलिसांशी सेटिंग करण्यासाठी आपल्या मित्राला ७ लाख रुपये दिले होते. त्याच मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत प्रारंभी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याबाबत टाळाटाळीचे धोरण अवलंबिल्या गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपी नंदनवन निवासी ३२ वर्षीय तन्मय जाधव आहे.
या प्रकरणात आतापर्यंत गुरुनुलेसह दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी अमरावती येथून खड्ड्यात लपवलेले ४८ लाख रुपये जप्त केले. गुरुनुलेच्या टोळीचा नेटवर्क देशातील बहुतांश राज्यात पसरला होता. गुरुनुले या रॅकेटचा सूत्रधार असून, तो पाच वर्षापासून प्रतापनगर ठाण्यांतर्गतच असलेल्या कार्यालयातून नागरिकांची फसवणूक करत होता. कोणतीही योजना एक ते दीड वर्ष चालविल्यानंतर तो ती बंद करत असे. गुरुनुले आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्यात नफा देत होते. मात्र, तीन-चार महिन्यापासून गुंतवणूकदारांना त्यांचा लाभ मिळणे बंद झाले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुरुनुले रक्कम देणारही होता. मात्र, नंतर ते देण्यात त्याने असमर्थता दर्शवली आणि गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारकर्ता गणेश चाफले यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रारंभी पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य घेतले नाही. चाफले यांनी नंतर मोठ्या अधिकाऱ्यांकडे प्रकरणाची तक्रार केली. अति. आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व डीसीपी नुरुल हसन यांच्या निर्देशानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि तीन आरोपींनी ताब्यात घेतले. त्यानंतर फसवणुकीचा व एमपीडीआयचे प्रकरण नोंदवण्यात आले.
डीसीपी नुरुल हसन यांना तपासणीत गुरुनुलेकडून पोलीस सेटिंगच्या नावे त्याच्या मित्राला तन्मय जाधवला ७ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती मिळाली. तन्मयने गुरुनुलेला पोलीसांशी सेटिंग करून प्रकरण पोलिसात अडकणार नाही, याची हमी दिली होती. पोलिसांनी तन्मयला अटक केली असून, ३ डिसेंबरपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. तो जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहे. पोलीस सेटिंगच्या नावे अनेक तक्रारी व प्रकरणे सातत्याने येत असल्याने पोलिसांनी या बाबतील गांभीर्य दाखवले नव्हते. मात्र, डीसीपी नुरुल हसन यांनी ज्या प्रकारे प्रकरणाच्या तळाशी जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या, ते प्रशंसनीय आहे. गुन्हेगारांच्या बाबतीत आपली झिरो टोलरन्स नीती असून, पोलिसांच्या नावे जो कुणी वसुली करेल त्याला बेड्या ठोकल्या जातील, असे नुरुल हसन यांनी सांगितले.
..............