राष्ट्रीय महालोक अदालतीत २४ हजार प्रकरणांचा निपटारा

By admin | Published: December 14, 2014 12:44 AM2014-12-14T00:44:28+5:302014-12-14T00:44:28+5:30

नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली.

Settlement of 24 thousand cases in the National Mahalok Adalat | राष्ट्रीय महालोक अदालतीत २४ हजार प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय महालोक अदालतीत २४ हजार प्रकरणांचा निपटारा

Next

नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली. ही टक्केवारी ७६ एवढी असून प्रलंबित प्रकरणे ६ टक्क्यांनी कमी झाली आहेत. विशेष अभियान अंतर्गतची ८ हजार ६०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ही माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने संयुक्तपणे या महालोक अदालतीचे आयोजन केले होते. प्रकरणे हाताळण्यासाठी ९४ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात एक न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
आठ लाखांच्या दाव्याचे पहिलेच यश
महालोक अदालतीच्या कामकाजाला प्रारंभ होताच निवृत्त जिल्हा न्यायाधीश कुबडे यांच्या प्रयत्नाने मोटार अपघात दाव्याचे एक प्रकरण केवळ तासाभरातच निकाली निघाले. अर्जकर्त्या वत्सला भगवान ठवकर यांनी त्यांचा ८ लाखांचा दावा ५ लाख रुपयात संपविला. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने लागलीच तडजोड रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या मार्फत ठवकर यांच्या स्वाधीन केला.
चाकूमारीचे प्रकरण
१९८० अर्थात ३४ वर्षांपासून प्रलंबित असलेले चाकूमारीचे प्रकरण आपसी समझोत्याने निकाली निघाले. आरोपी कृष्णराव पौनीकर आणि उरकुडा भुजभुजे यांनी हुमदेव फटिंग यांच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले होते. लकडगंज पोलीस ठाण्यात भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल होता. समझोता होऊन दोन्ही पक्ष स्मित हास्याने न्यायालयातून परत गेले.
महिला आरोपीला दिलासा
वाडी भागातील विजया हिरणवार नावाच्या एका महिलेने सीताबाई डोंगरे हिला उसणे पैसे दिले होते. विजया आपले पैसे मागण्यासाठी सीताबाईकडे गेली असता तिने मारहाण केली होती. १२ मे १९९७ रोजी सीताबाईविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १७ वर्षांपासून या दोघीही न्यायालयाच्या चकरा मारून त्रस्त झाल्या होत्या. महालोक अदालतीत त्यांच्यात समझोता झाला.
पावणेसात कोटींवर रक्कम जमा
भूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरणे, प्रकरण दाखलपूर्व वसुली दावे यातून एकूण ६ कोटी ८६ लाख ४५ हजार ६३ रुपयांची रक्कम तडजोडीच्या स्वरूपात प्राप्त झाली. दंडापोटी ३३ लाख ४५ हजार ८५२ रुपयांची रक्कम जमा झाली. तीन कोटींवर रक्कम मोटार अपघात दाव्यांची तर दोन कोटींवर रक्कम धनादेश अनादर प्रकरणातील तडजोडीची होती.
अन् संसार विस्कटला होता
या महालोक अदालतीमध्ये विस्कटलेल्या एका नवदाम्पत्याच्या संसाराला नवी दिशा मिळाली. २५ मे २०१३ रोजी थाटात विवाह समारंभ पार पडून दुसऱ्या दिवशीच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही विलग झाले होते. दोघांचे प्रकरण विधीसेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात आल्यानंतर ते मध्यस्थाकडे पाठविण्यात आले होते. अनेक बैठकानंंतर आज समझोता होऊन दोघेही नव्याने संसार करण्यास तयार झाले.
३१ वर्षांनंतर फसवणूक प्रकरण निकाली
आंबेडकरनगर येथील ललिता गायकवाड नावाच्या एका महिलेने आरोपी दयानंद यादव याला सोनसाखळी पॉलिश करण्यासाठी दिली होती. पॉलिशनंतर वजन कमी झाल्याचे समजताच यादव आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. नरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून १९ एप्रिल १९८३ रोजी सीताबर्डी पोलिसांनी यादवविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण महालोक अदालतीत तडजोडीने निकाली निघाले.
पक्षकारच उत्कृष्ट न्यायाधीश
लोकअदालत हे वाद निवारणाचे प्रभावी तंत्र आहे. पक्षकार हे स्वत:च त्यांचा वाद समजवून घेणारे उत्कृष्ट न्यायाधीश असतात. त्यांना वस्तुस्थितीची चांगली जाण असते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी याप्रसंगी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Settlement of 24 thousand cases in the National Mahalok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.