वस्त्यात पाणी साचले; चौक बनले तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:03+5:302021-07-09T04:07:03+5:30
मनपाच्या दाव्याची पोलखोल : मुसळधार पावसामुळे दाणादाण : सहा तासांत ९४.२. मि.मी. पावसाची नोंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...
मनपाच्या दाव्याची पोलखोल : मुसळधार पावसामुळे दाणादाण : सहा तासांत ९४.२. मि.मी. पावसाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह परिसरात गुरुवारी सकाळपासून मेघगर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल झाली. सखल भागातील वस्त्यांत पाणी साचले. अनेक चौकातही पाणी तुंबल्याने तलावाचे स्वरूप आले होते. शहरातील ३० ते ४० ठिकाणी पाणी साचले होते, तर काही ठिकाणी झाडे पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सहा तासांत ९४.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाळी नाल्यांतील कचरा व गाळ न काढल्याने जोराच्या पहिल्याच पावसात शहरात जागोजागी पाणी तुंबल्याचे चित्र होते. पावसाचा जोर कायम राहिला असता तर अनेक वस्त्या जलमय होण्याचा धोका होता. मदतीसाठी आलेल्या कॉलनुसार अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेत तुंबलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला. काटोल रोडवरील पोलीस मुख्यालयाजवळ पावसामुळे झाड पडले. शांती नगर विनायक हायस्कूलनजीक व त्रिमूर्ती चौकातील चैतन्य अपार्टमेंट जवळ झाड पडले.
....
या वस्त्या व चौकात साचले पाणी
छत्रपती चौकातील मनीष नगर अंडर ब्रीजखाली पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रतापनगर रिंगरोडवरील वीरेंद्र अपार्टमेंट जवळ, नारा रिंगरोडवरील वैभव अपार्टमेंट जवळ पाणी साचले होते. स्मृती टॉकीज अशोका चौकाजवळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून जाताना कसरत करावी लागली. यशोधरा नगर येथील वनदेवीनगर झोपडपट्टीत पाणी तुंबले होते. महाल परिसरातही पाणी तुंबले होते. याच भागातील पडोळे हॉस्पिटल परिसरात पाणी तुंबले होते. पारडी भागातील एचबी टाऊन, सुरेंद्रगड येथील अग्रवाल दवाखान्याजवळ पाणी तुंबले होते. धरमपेठ झेंडा चौकाच्या खालच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मानेवाडा रोडवरील बालाजी नगर येथील प्रवीण किराणा जवळ पाणी तुंबले होते. पोलीस लाईन टाकळी, आमदार निवास समोर पाणी साचले होते.
...
मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा
पावसाळ्यातील अतिवृष्टीची शक्यता विचारात घेता शहरात पाणी साचणार नाही, वाहतूक ठप्प पडणार नाही. यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात होता. महापौर, आयुक्तांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. शहरातील नदी, नाले, गटार व पावसाळी नाल्यांची स्वच्छता करण्याचे वेळोवेळी निर्देश देण्यात आले. मात्र, पावसाळी नाल्या व चेंबर साफ करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला.
...
अर्धवट सिमेंट रस्त्यामुळे पाणी साचले
शहरात सुरू असलेली सिमेंट रस्त्याची कामे व बुजलेल्या पावसाळी नाल्या यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याला मार्ग नव्हता. यामुळे शहरातील अनेक चौकात पाणी साचले होते. शहरातील गटारे व पावसाळी नाल्याची सफाई झाली नसल्याबाबत ‘लोकमत’ने आधीच वृत्त प्रकाशित केले होते. परंतु, त्यानतंरही प्रशासन जागे झाले नाही. यामुळे अनेक वस्त्यांत पाणी साचले.