सेतू हाऊसफुल्ल
By admin | Published: June 16, 2017 02:00 AM2017-06-16T02:00:33+5:302017-06-16T02:00:33+5:30
दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच विविध प्रमाणपत्र बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील
विविध प्रमाणपत्रांसाठी लागताहेत रांगा :
निकालानंतर गर्दी आवरेना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच विविध प्रमाणपत्र बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतूमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून सेतू कार्यालय गर्दीने हाऊसफुल्ल होत आहे. कार्यालयाबाहेरपर्यंत रांगाच रांगा लागत आहेत. ही गर्दी आणखी काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. दहावी-बारावीचा निकाल लागल्यावर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयता, डोमीसाईल, उत्पन्न आदी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे परीक्षांचे निकाल जाहीर होताच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी होत असते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनुसार सामान्यपणे दर दिवशी विविध प्रमाणपत्रासाठी जवळपास हजार अर्ज येतात. परंतु सध्या याची सख्या दीड ते पावणे दोन हजारापर्यंत पोहोचली आहे.
अतिरिक्त शुल्क आकारल्यास महा ई-सेवा केंद्राविरुद्ध कारवाई
प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महा ई-सेवा केंद्राद्वारे याचा फायदा घेत अतिरिक्त शुल्क आकारल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गांभीर्याने घेतली असून नियोजित शुल्कच आकारण्यात यावे, कुणी अतिरिक्त शुल्क आकारत असतील तर त्याची तक्रार करावी, कुणी यात दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
विशेष शिबिरानंतरही
गर्दी कायम
दहावी-बारावीनंतर सेतू कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत शाळांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले होते. दोन टप्प्यांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. यासोबत प्रत्येक तालुक्यातही विशेष शिबिर घेण्यात आले.