दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च होणार साडेसात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:09 AM2021-02-27T04:09:29+5:302021-02-27T04:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिव्यांगांच्या कल्याणासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित आरक्षित निधीला ...

Seven and a half crore will be spent for the welfare of the disabled | दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च होणार साडेसात कोटी

दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च होणार साडेसात कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिव्यांगांच्या कल्याणासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित आरक्षित निधीला ३१ मार्चच्या अगोदर दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रकारे दिव्यांगांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी वेबपेजदेखील बनविण्यात आले आहे. यामुळे अ़नेक प्रकारच्या योजनांचा लाभ थेट दिव्यांगांना उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

महापौरांनी मनपा मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी समिती सदस्य नगरसेवक दिनेश यादव, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.

बैठकीनंतर तिवारी यांना पत्रकारांना महिती दिली. अगोदर कानपूरच्या कंपनीच्या ट्रायसिकलचे वाटप होत होते. मात्र त्या खराब झाल्यानंतर त्यांना दुरुस्त करणे कठीण होते. त्यामुळे आता स्थानिक ट्रायसिकललाच प्राधान्य दिले जाईल. बँकांची ‘प्रोसेसिंग फी’देखील लागणार नाही. कर्णबधीर मुलांच्या ‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’साठी मनपाने २५ लाखांची तरतूद केली आहे. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोहीम व समाज कल्याण विभागाच्या योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

यासोबत दिव्यांगांना शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत, विविध गटांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी दोन कोटींची तरतूद मनपातर्फे करण्यात आली आहे. पंतप्रधान गृह योजनेअंतर्गत मिळणारी अडीच लाख रुपयांच्या मदत निधीसोबतच ५० हजार रुपये मनपातर्फे देण्यात येतील. मनपाच्या मॉल व दुकानांमध्ये दिव्यांगांना ५ टक्के आरक्षण देण्यात येईल. दिव्यांगांची दुकाने तोडण्यात येऊ नये असे निर्देश दिले असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांग खेळाडूंसाठी गुरुगोविंदसिंह स्टेडियम

शहरातील दिव्यांग खेळाड़ूंसाठी उत्तर नागपुरातील गुरुगोविंदसिंह स्टेडियम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते तेथे सराव करु शकतील. सोबतच तेथील जीमला अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनिश्वर यांचे नाव दिले जाईल. राज्यापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा प्रवास व राहण्याच्या खर्चातील ७५ टक्के वाटा मनपा देईल, असे त्यांनी सांगितले.

तर गुन्हा नोंदविणार

दिव्यांगाना अवैध पद्धतीने दुकान देण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकरणांचा शोध घेण्यासाठी मनपाच्या समुपदेशकांकडून सर्वेक्षण करुन दिव्यांगांना दुकानाच्या बदल्यात पैसे मागणाऱ्यांचा शोध घेण्यात येईल. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Seven and a half crore will be spent for the welfare of the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.