वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

By admin | Published: February 20, 2016 03:29 AM2016-02-20T03:29:21+5:302016-02-20T03:29:21+5:30

तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत.

Seven cows are killed in a tiger attack | वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

Next

उमरेड, नवेगाव शिवारातील घटना : ९ जनावरे गंभीर जखमी, ३१ बेपत्ता
उमरेड : तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत. शिवाय, ३१ जनावरे बेपत्ता आहेत. ही घटना उमरेड येथून १० कि.मी.वरील नवेगाव (साधू) शिवारात गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दहशत निर्माण झाली आहे.
श्रीराम बनकर, रा. नवेगाव (साधू), ता. उमरेड यांची गावालगत शेती आहे. या शेतात गुरांची दावण असून, त्यात १२० जनावरे नेहमीप्रमाणे बांधली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे पाच वाघांनी या जनावरांवर एकाचवेळी हल्ला चढविला. पहाटेपर्यंत वाघांची शिकारीसाठी ओढाताण सुरू होती. सर्वच जनावरे जीवाच्या आकांताने सुसाट सैरावैरा पळत होती, हंबरडा फोडत होती. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग श्रीराम बनकर यांनी प्रत्यक्ष अनुभवला. ते शेतातील मचाणावर जागली करीत होते.
माहिती मिळताच ग्रामस्थांनी सकाळी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दुसरीकडे, सूचना देऊनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत वनविभागाचा एकही बडा अधिकारी घटनास्थळी हजर झाला नाही. ‘साहेब, गेले कुठे’ अशी विचारणा वनविभागातील वाहनचालक शकील शेख यांना केली असता ‘ते’ नागपूरहून येत असल्याचे सांगितले. वनरक्षक पी. टी. कामडी, वनमजूर ए. बी. वैरागडे, वन्यजीवचे नितीन राठोड, प्रशांत हिवरकर शेतकऱ्यांची विचारपूस करून पंचनामा करीत होते. (प्रतिनिधी)

‘चांदी’चे बछडे असावेत
या घटनेबाबत वन्यप्रेमी सुहास बोकडे, पक्षीतज्ज्ञ नितीन राहाटे यांच्याशी चर्चा केली असता, हे चांदी नामक वाघिणीचे बछडे असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चांदीला चार बछडे असून, ते १८ महिन्यांचे आहेत. गाय व वासरांच्या शरीरावरील जखमा फारशा खोल नाहीत. हल्ला करीत असताना सैरावैरा पळत सुटल्यानेच वाघही भीतीने जनावरांवर तुटून पडले असावेत आणि यातच जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा हल्ला नवलच
वाघ कधीच समूहाने शिकार करीत नाही. तो गनिमी काव्याने शिकार करतो. परंतु, चांदीचे बछडे १८ महिन्यांचे आहेत. ते शिकार शोधण्यासाठी समूहाने पोहचले. जनावरांच्या कळपावर हल्ला करताच जनावरे सुसाट पळायला लागली. वाघही गोंधळले आणि त्यातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. असा प्रकार सहसा घडत नाही. बछड्यांच्या सोबतीला चांदी नसावी, असेही बोलले जात आहे.

मोबदला ताबडतोब हवा
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतर वनविभाग तातडीने मोबदला देत नाही, अशी कैफियत विठ्ठल बोढे यांनी मांडली. या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी माजी नगरसेवक दयालचंद्र पौनीकर, गोविंदा बोढे, देवराव कोळसे यांनी केली आहे. अभयारण्याच्या सभोवताल सौरऊर्जा कुंपण लावण्याची मागणीही सचिन तळेकर यांनी केली. लोकप्रतिनिधी व वनविभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाघांना पाहून घाबरलो
मी मचाणावर झोपून होतो. त्यातच जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकायला आला. वरूनच वाकून बघितले तेव्हा एक वाघ काही अंतरावरच गाईवर तुटून पडत होता. दोन-तीन वाघ काही अंतरावर गाईच्या कळपाजवळ असावेत. त्या ठिकाणीही ओढाताण सुरू होती. दावे तोडून जनावरे शेतात पळत सुटली होती. मी खूप घाबरलो. कधी वाकून बघायचो तर, कधी पांघरून घ्यायचो. सकाळी ६ वाजताच्या सुमारासच मचाणावरून खाली उतरलो. त्यानंतर लोक गोळा व्हायला लागले.
- श्रीराम बनकर, शेतकरी

वाघांना लागली ‘चटक’
गाईला जंगलात दावणीला बांधून वाघाच्या शुटींग प्रकरणाचा लोकमतने नुकताच पर्दाफाश केला. सकाळीच लोकमतची चमू घटनास्थळी दाखल झाली. अशातच ‘भाऊ, वाघाला गाईची चटक लागली’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी ‘गाय’ प्रकरण किती गंभीरपणे घेतले, याचा हा नमुनाच होता.

Web Title: Seven cows are killed in a tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.